पुण्यातील महाविद्यालयीन निवडणूका हाच राजकीय कारकिर्दीचा पाया : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 15:57 IST2018-11-11T15:56:38+5:302018-11-11T15:57:56+5:30
'पेपरलिफ'तर्फे आयोजित आठवणीतले पुणे या कार्यक्रमात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यानी पवार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची मुलाखत घेतली त्यावेळी दाेघांनी पुण्यातील अाठवणींना उजाळा दिला.

पुण्यातील महाविद्यालयीन निवडणूका हाच राजकीय कारकिर्दीचा पाया : शरद पवार
पुणे : पुण्यात शिकताना लढवलेल्या महाविद्यालयीन निवडणूका हाच राजकारणातील कारकिर्दीचा पाया असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 'पेपरलिफ'तर्फे आयोजित आठवणीतले पुणे या कार्यक्रमात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यानी पवार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची मुलाखत घेतली त्यावेळी पवार बाेलत हाेते.
'स्मरणरम्य पुणे दिनदर्शिका २०१९' आणि 'पुणे एकेकाळी' या कॉफीटेबल पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात अाले. यावेळी लेखक मंदार लवाटे, पेपरलीफचे संस्थापक जतन भाटवडेकर उपस्थित होते. पवार म्हणाले, पुण्यात शिकताना विविध महाविद्यालयीन निवडणुका 'पवार पॅनेल'च्या माध्यमातून लढविल्या. आज राजकारणातील कारकिर्दीला ५२ वर्षे पूर्ण होत आहेत. पण पुण्याच्या त्या निवडणुका हाच त्याचा पाया आहे. पवार पुण्याबद्दल भरभरुन बाेलत असताना अाता पुण्याचे नेतृत्व करायला अावडेल का असा प्रश्न गाडगीळ यांनी केला असता अाता निवडणूक नाही असे सांगत उत्तर द्यायचे पवारांनी टाळले.
पानशेत पुराची अाठवण सांगताना पवार म्हणाले, पानशेत धरण फुटल्यामुळे पुण्याचे माेठे नुकसान झाले. अाम्ही त्यावेळी महाविद्यालयात हाेताे. अामच्या पीटीच्या सरांचे घर या पुरामध्ये वाहून गेले. ते अतिशय दुःखी हाेऊन रडत हाेते. त्यावेळी अाम्ही सर्व ठीक हाेईल असे म्हणत त्यांना धीर देत हाेताे. त्यावर जर्मनी ऑलिम्पिक मध्ये मिळवलेले पदक वाहून गेल्याचे मला अतिशय दुःख असल्याचे ते म्हणाले. या वाक्यातून सरांची देश अाणि खेळावर असलेली निष्ठा दिसली.
वेस्टएण्डला जाऊन पाहिलेला इंग्लिश सिनेमा, महिन्याकाठी घरून मिळणाऱ्या पैशाच्या शिलकेत कासमशेठच्या खिम्याची मेजवानी, १९६२ च्या भारत - चीन युद्धदरम्यान शहरात काढलेला विद्यार्थ्यांचा मोर्चा, गदिमा, पु.ल आणि बाबूजींशी असलेले नाते, पवारांच्या सूचनेनुसार श्रीनिवास पाटील यांनी राजीनामा देत राजकारणात केलेला प्रवेश, अशा विविध आठवणींच्या स्मरण रंजनात उभय नेते रमले होते.