जीन्स घातली म्हणून विधवा सुनेला सासूकडून मारहाण, दीराने हात मोडला; पोटची मुलगीही आईच्या विरोधात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:30 IST2026-01-02T14:30:29+5:302026-01-02T17:30:55+5:30
पुण्यात घराबाहेर जीन्सवर उभ्या असलेल्या सुनेला सासूने जबर मारहाण केली.

जीन्स घातली म्हणून विधवा सुनेला सासूकडून मारहाण, दीराने हात मोडला; पोटची मुलगीही आईच्या विरोधात
Pune Crime: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका ३३ वर्षीय विधवा महिलेने केवळ जीन्स पॅन्ट घातल्यावरुन तिला मारहाण करण्यात आली. या क्षुल्लक कारणावरून तिची सासू, दीर आणि स्वतःच्याच मुलीने तिला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सहकारनगर भागात घडला आहे. या अमानवी मारहाणीत पीडितेचा हात मोडला असून ती सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहे.
तक्रारदार महिला ही कचरावेचक असून ती आपल्या चार मुलांसह सहकारनगरमधील तळजाई वसाहतीत राहायला आहे. तीन वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास ही महिला जीन्स घालून घराबाहेर उभी होती. यावेळी तिची सासू सविता ही तिथे आली आणि सुनेला जीन्समध्ये पाहून तिचा राग अनावर झाला. सासूने थेट सुनेचे केस ओढायला सुरुवात केली आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेत सर्वांसमोर अपमानित केले.
मुलीनेही आईलाच मारले
पीडित महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा तिची मोठी मुलगी तिथे धावून आली. मात्र, आईला वाचवण्याऐवजी ती स्वतःच्या आजीच्या बाजूने उभी राहिली आणि आईलाच मारहाण करू लागली. याच दरम्यान महिलेचा दीरही तिथे पोहोचला आणि त्याने पीडितेचा डावा हात इतक्या जोरात पिरगळला की तिच्या मनगटाचे हाड जागेवरच मोडले. या नराधमांनी केवळ महिलेलाच नाही, तर तिच्या लहान मुलांनाही धक्काबुक्की केली आणि तिचा मोबाईल हिसकावून घेतला.
ससून रुग्णालयात उपचार सुरू
गंभीर जखमी झालेल्या या महिलेला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर पीडितेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी सासू, दीर आणि मुलीवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये मारहाण, शिवीगाळ आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बालकल्याण समितीलाही या घटनेची माहिती देण्यात येणार आहे.