Pune: दारूच्या बदल्यात अनैसर्गिक संबंध; दोघांच्यात वाद, डोकं, तोंड, गळ्यावर चाकूने वार करून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 09:40 IST2025-06-06T09:40:23+5:302025-06-06T09:40:44+5:30
खून झालेल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे दारूची मागितल्यावर त्याने शरीर संबंधाची मागणी केली होती

Pune: दारूच्या बदल्यात अनैसर्गिक संबंध; दोघांच्यात वाद, डोकं, तोंड, गळ्यावर चाकूने वार करून खून
पुणे : मंडई मेट्रो स्टेशनसमोरील बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये चाकूने वार करून एका व्यक्तीचा खून करण्यात आला. बुधवारी (दि. ४) सकाळी साडेपाचच्या सुमारास लक्ष्मीनारायण हाईट्स या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या शीतल बियर शॉपीसमोरील जागेत ही घटना घडली. दरम्यान, खून झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आरोपीला शिरूर येथून अटक केली आहे. रमेश प्रकाश सत्रे (२२, व्यवसाय - मजुरी, रा. बाजीराव रोड, पुणे, मूळ रा. मु.पो. कात्रड वांभुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माणिक वाघमारे (३७) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश सत्रे हा केटरिंगचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानजवळील फूटपाथवर बंद पडलेल्या रिक्षामध्ये तो राहतो. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मंडई मेट्रो स्थानक परीसरातील लक्ष्मीनारायण हाईटस या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या शीतल बिअर शॉपीसमोर आरोपीने अनोळखी व्यक्तीचा खून केला. आरोपीने खून झालेल्या व्यक्तीच्या डोक्यावर, तोंडावर तसेच गळ्यावर चाकूने वार केल्याचे दिसून आले आहे. खून झालेल्याचे वय ५० ते ५५ वर्षे असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. खून झालेल्या व्यक्तीबाबत पोलिसांनी स्थानिकांकडे चौकशी केली. मात्र, त्याची ओळख पटू शकली नाही.
आरोपी सत्रे हा येथील शितल बिअर शॉपीसमोर मद्यप्राशन करत बसला होता. त्यावेळी खून झालेला व्यक्ती तेथे आला. त्याने सत्रे याच्याकडे दारू मागितली. त्या बदल्यात सत्रे याने खून झालेल्या व्यक्तीकडे अनैसर्गिक संबंधाची मागणी केली. त्यातून दोघांत वाद झाला. त्यावेळी सत्रे याने चाकूने वार करून संबंधित व्यक्तीला गंभीर जखमी केले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर सत्रे फरार झाला होता.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. त्यावेळी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील, कृष्णा बाबर, कर्मचारी अनिकेत बाबार, शशिकांत दरेकर, नीलेश जाधव, अमित जमदाडे यांच्या पथकाला सत्रे हा शिरुर येथे त्याच्या भावाच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.