Pune traffic : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक बदल; धायरी फाट्यावर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:37 IST2025-07-04T10:37:23+5:302025-07-04T10:37:36+5:30
या कार्यक्रमासाठी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

Pune traffic : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक बदल; धायरी फाट्यावर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली
पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले असून, गुरुवारी रात्री त्यांचे शहरात आगमन झाले. आज (शुक्रवार, दि. ४) सकाळी ११:३५ वाजता एनडीएमधील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या बदलांमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. धायरी फाटा परिसरात रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिंहगड रोडसह धायरी परिसरातही सकाळी ९.३० च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली होती.
धायरी फाट्यावर वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकली... आज सिंहगड, धायरी, वारजे भागात प्रचंड ट्रॅफिक... #PuneTraffic#dhayri#Sinhagad#SinhagadRoad#Warje#Traffic#AmitShahpic.twitter.com/Z6OBn23so0
— Lokmat (@lokmat) July 4, 2025
वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन वाहतूक विभागांतर्गत मोर ओढा ते सर्किट हाउस ते आयबी चौक यादरम्यानची एकेरी वाहतूक आवश्यकतेनुसार दुतर्फा करण्यात येणार आहे. तसेच, दुपारी १२:०० ते संध्याकाळी ५:०० दरम्यान मंतरवाडी फाटा ते खडी मशीन चौक ते कात्रज चौक यादरम्यान सर्व प्रकारच्या मालवाहतुकीच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून, प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.