घरचा मानसिक ताण नडला, तरुण थेट विजेच्या खांबावर चढला..! नको तेच झालं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 19:38 IST2025-05-06T19:36:14+5:302025-05-06T19:38:32+5:30
तो वारंवार "जर कोणी वर आलं, तर मी उडी टाकीन" अशी धमकी देत होता

घरचा मानसिक ताण नडला, तरुण थेट विजेच्या खांबावर चढला..! नको तेच झालं
राजगुरुनगर (ता. खेड) – घरातील मानसिक ताण सहन न झाल्यामुळे आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विद्युत पोलवर चढलेल्या २२ वर्षीय तरुणाचा जीव पोलिस व ग्रामस्थांच्या सतर्कतेने वाचवण्यात यश आले. ही घटना आज दुपारी खेडजवळील निमगाव परिसरात घडली.
अधिकच्या माहितीनुसार, संबंधित तरुण दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अमूल डेअरीजवळील विद्युत वाहक पोलवर चढला. त्यावेळी पोलवर विद्युत प्रवाह सुरू होता, त्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. जवळपास दोन तास तो तरुण पोलवरच बसून होता. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ महावितरणला कळवून वीजपुरवठा बंद करून घेतला.
पोलिस आणि ग्रामस्थांनी मिळून तरुणाला खाली यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वारंवार "जर कोणी वर आलं, तर मी उडी टाकीन" अशी धमकी देत होता. पोलिस हवालदार मोहन अवघडे व इतर नागरिकांनी तातडीने पोलखाली जाळी धरून तरुणाच्या सुरक्षिततेची व्यवस्था केली.शेवटी, तरुणाने उडी घेतली, यावेळी खाली धरलेल्या जाळीत पडल्यामुळे त्याचा जीव वाचला. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, पुढील वैद्यकीय आणि मानसिक उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.