ऑक्टोबर हिटनंतर पुणेकरांना सुखद गारव्याचा अनुभव; १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:26 IST2025-11-12T10:26:42+5:302025-11-12T10:26:56+5:30
यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पुण्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे

ऑक्टोबर हिटनंतर पुणेकरांना सुखद गारव्याचा अनुभव; १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात गुलाबी थंडी पडली आहे. पहाटे आणि संध्याकाळी हवेतील गारव्याने पुणेकर गारठले आहेत. शहरात मंगळवारी तापमानाचा पारा स्थिर राहून १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस तापमानात अजून घट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. राज्यातही ९.२ अंश सेल्सिअस सर्वाधिक नीचांकी तापमानाची जळगावमध्ये नोंद झाली.
ऑक्टोबर हिटनंतर पुणेकरांना हवेत सुखद गारवा जाणवू लागला आहे. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पुण्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी स्वेटर, मफलरसारखे ऊबदार कपडे वापरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चार दिवसात तापमानात सहा अंशाने घट झाली आहे. सोमवारी १३.२ इतकी हंगामातील सर्वाधिक नीचांकी तापमान नोंदविले गेले होते. मंगळवारी (दि.११) तापमानाचा पारा काहीसा स्थिर राहिला. त्यामुळे सकाळी शाळेत जाणारी मुले ऊबदार कपडे घालूनच घरातून बाहेर पडली. सकाळी १० वाजेपर्यंत गारवा कायम होता. दुपारी ऊन वाढले, मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत तीव्रता कमी जाणवली. सोमवारच्या तुलनेत कमाल तापमानात घट होऊन ३० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.