पुणेकरानं पेट्रोलपंप चालकाला शिकवला चांगलाच धडा; भरायला लावला '६० हजार दंड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:23 IST2025-04-02T17:21:55+5:302025-04-02T17:23:11+5:30
पेट्रोल पंपावर हवा भरण्याची सोय नाही, टॉयलेटही अस्वच्छ, पिण्याचं पाणी नाही

पुणेकरानं पेट्रोलपंप चालकाला शिकवला चांगलाच धडा; भरायला लावला '६० हजार दंड'
अश्विनी जाधव केदारी
पुणे: पुण्यातील एका पेट्रोल पंपावर पाणी हवा आणि स्वच्छतागृह यासारख्या सुविधा नसल्याने एका जागरूक पुणेकराने याबाबत तक्रार केली आणि त्या पेट्रोल पंप चालकाला दंड आकारला गेला आहे.
पेट्रोल पंपावर पाणी गाडीच्या चाकात भरण्यासाठी हवा, आणि स्वच्छतागृह या मूलभूत गोष्टी ग्राहकांना मिळायलाच हव्या असा नियम आहे. मात्र बऱ्याचदा अनेक पेट्रोल पंपावर या गोष्टी पाहायला मिळत नाहीत. आणि पेट्रोल पंप चालक त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात, पण असं दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं याचे एक उदाहरण पुण्यात पाहायला मिळाले, पुण्यातील एका पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याने आणि हवा भरण्याची सोय नसल्याने एका जागरूक पुणेकर नागरिकांना याची तक्रार केली. प्रफुल्ल सारडा असे या तरुणाचे नाव आहे. पेट्रोल पंपावर वर चांगलं स्वच्छ टॉयलेट, मोफत हवा असणं. मात्र अनेक पेट्रोल पंपावर ते दिसत नाहीत. आणि तसं नाही दिसलं त्याच्या विरोधात सारडा याने चक्क तक्रार केली.
सारडा म्हणाला, कोंढवा रोडवर ईश्वर सर्व्हिस स्टेशन नावाचं बीपीएलचा पेट्रोल पंप आहे. त्याठिकाणी गेले काही महिने मी जात आहे. तिथं पिण्याचं पाणी नाही. टॉयलेट खूप अस्वच्छ होतं. ग्राहकांना हवा मोफत मिळायला पाहिजे. ती तिथे वर्षातनं सहा ते आठ महिने मिळत नाही. आणि त्यांनी ती जागा दुसऱ्या पंक्चरवाल्याला काही तरी भाड्याने दिलेली असते. आणि तो तिथून मग तुमचे पाच दहा रुपये घेतो. ज्यावेळी मी याची तक्रार केली. आणि बीपीएलच्या संबंधित अधिकाऱ्याला मी त्याला सांगितलं की, गेले अनेक महिने हा त्रास सुरू आहे. टॉयलेट अस्वच्छ असून त्याचा खूप वास येतो. आणि तिथे जेन्टस , लेडीज कोणीही जाऊ शकत नाही. अशा गोष्टी मी त्याच्या निदर्शनात आणून दिल्या. जवळपास दहा ते बारा दिवस त्याच्याशी फॉलो अप घेतल्यानंतर त्यांनी ऑडिट केलं. आणि त्या पेट्रोलपंपाला जो नितीन ईश्वरलाल चहा याच्या नावानी आहे. त्याला साठ हजार रुपयाचा दंड लावला.
पेट्रोल पंपावर या मूलभूत गोष्टी असायलाच हव्या आणि त्या नसतील आणि तुम्ही जर त्याची तक्रार केली. तर निश्चितच पंप चालकांना दंड आकारला जाऊ शकतो. आणि त्यामुळे अशा प्रकारे जागरूक राहून जर प्रत्येक नागरिकानं वेळीच लक्ष दिलं तर या समस्या निश्चितच सुटायला मदत होईल. असेही त्याने यावेळी सांगितले.