Pune: "तुझ्या कपाळावरील टिकली काढून टाक"; वडिलांची भेट, पत्नीला कॉल आणि घेतला कायमचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:56 IST2025-12-29T16:55:06+5:302025-12-29T16:56:47+5:30
Pimpri Chinchwad Crime: एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना मावळ तालुक्यात घडली आहे. एका ४३ वर्षीय व्यक्तीने वडिलांची भेट घेतली, पत्नीला कॉल केला आणि त्यानंतर जगाचा निरोप घेतला.

Pune: "तुझ्या कपाळावरील टिकली काढून टाक"; वडिलांची भेट, पत्नीला कॉल आणि घेतला कायमचा निरोप
गावी जाऊन वडिलांची भेट घेतली. परत येताना इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलावर थांबले. तिथूनच भावाला कॉल केला आणि मी आत्महत्या करत आहे, असे सांगितले. त्यानंतर पत्नीलाही कॉल केला आणि म्हणाले, 'तुझ्या कपाळावरील टिकली काढून टाक.' त्यानंतर कॉल बंद केला आणि इंद्रायणी नदीत उडी मारली. ४३ वर्षीय मंगेश जांभुळकर यांचा त्यानंतर मृतदेहच मिळाला.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ही घटना घडली. ४३ वर्षीय मंगेश जांभुळकर यांनी कर्जाच्या चिंतेतून आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ते एका पेपर मिलमध्ये कामाला होते.
पुलावर दुचाकी, मोबाईल आणि पाकिट ठेवतोय
मंगेश जांभुळकर हे आकुर्डीतून आपल्या मूळ गावी म्हणजे भोईरे येथे गेले होते. वडिलांची भेट घेतली. त्यानंतर ते माघारी फिरले. टाकवे येथे इंद्रायणी नदीवर असलेल्या पुलावर ते थांबले. तिथूनच त्यांनी त्यांच्या भावाला कॉल केला.
कॉल करून मंगेश हे भावाला म्हणाले, 'मी आत्महत्या करत आहे. पुलावर दुचाकी, मोबाईल आणि पाकीट ठेवत आहे.'
भावाशी बोलून झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला कॉल केला. पत्नीला म्हणाले, 'तुझ्या कपाळावरील टिकली काढून टाक.' त्यानंतर त्यांनी कॉल बंद केला आणि इंद्रायणी नदीत उडी मारली.
पत्नी, भाऊ पोहोचले पण...
मंगेश यांनी आत्महत्या करण्याबद्दल कॉल केल्यानंतर त्यांचा भाऊ आणि पत्नी घटनास्थळी आले. पण, तोपर्यंत मंगेश यांनी नदी उडी मारली होती. त्यांनी शोधाशोध केली, पण ते कुठेही दिसले नाही.
याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात आले. बराच काळ शोध घेऊनही ते सापडले नाही त्यानंतर वडगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
शिवदुर्ग मित्र मंडळ आणि वनजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध घेताना इंद्रायणी नदी त्यांचा मृतदेह सापडला. भाऊ आणि पत्नीला बोलावून ओळख पटवण्यात आली. त्यात तो मंगेश यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.