Pune Rain: कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने परिस्थिती उद्भवली; पुणे महापालिकेने हात झटकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 20:51 IST2026-04-02T20:49:55+5:302026-04-02T20:51:10+5:30
Pune Rain अलीकडे पावसाचा बदलत्या पॅटर्ननुसार केंद्र शासनाने पावसाळी लाईन्ससाठी आतापेक्षा दुप्पट व्यासाच्या लाईन्स टाकण्याच्या गाईडलाईन्स दिल्या आहेत

Pune Rain: कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने परिस्थिती उद्भवली; पुणे महापालिकेने हात झटकले
पुणे: शहरात कमी वेळात अधिक अवकाळी वादळी पाऊस झाला. रस्त्यावरील कचरा आणि झाडांची पाने ही चेंबरवरील जाळ्यात अडकल्याने पाण्याचा निचरा होण्यास काही वेळ लागल्याने रस्त्यावर पाणी साचून राहिले होते, ही वस्तुस्थिती आहे, असे म्हणत महापालिका अधिकाऱ्यांनी हात झटकले आहेत.
शहरातील पावसाळी गटारांचे आकार ५० मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेण्याच्या आकाराचे आहेत. अलीकडे पावसाचा बदलत्या पॅटर्ननुसार केंद्र शासनाने पावसाळी लाईन्ससाठी आतापेक्षा दुप्पट व्यासाच्या लाईन्स टाकण्याच्या गाईडलाईन्स दिल्या आहेत. यापुढील काळात रस्त्यांची कामे करताना मोठ्या व्यासाच्या लाईन्स टाकण्यात येतील, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. दरम्यान, पाउस सुरू असताना स्थायी समितीची बैठक सुरू होती. स्थायी समिती अध्यक्षांनी सर्व झोनल आणि संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीतूनच फिल्डवर जाण्याच्या सूचना दिल्याचे राम यांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कार्यालय सोडू नका
अवकाळी पावसाच्या काळात अतिवृष्टी, पाणी साचणे, पूरस्थिती इत्यादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून कार्यवाही करावी. तसेच आवश्यकतेनुसार पाणी निचरा, रस्ते स्वच्छता, धोकादायक स्थळांची पाहणी व इतर उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्या. वरिष्ठ अधिकारी यांना परिस्थितीबाबत वेळोवेळी माहिती द्यावी, यामध्ये कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.