पुणे जिल्ह्यातील २१ मंडळांत अतिवृष्टी, ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:25 IST2025-05-27T09:23:48+5:302025-05-27T09:25:29+5:30
- केवळ मे महिन्याचा विचार केल्यास जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९९० टक्के अर्थात २२२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील २१ मंडळांत अतिवृष्टी, ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस
पुणे : जिल्ह्यात रविवारी पावसाने बारामती, इंदापूर, दौंड या तीन तालुक्यांत अक्षरशः धुमाकूळ घातला. या तीन तालुक्यांमधील एकूण ८ तर जिल्ह्यातील एकूण २१ मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात रविवारी सरासरी ५३.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात लोणावळा येथे सर्वाधिक २३६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. केवळ मे महिन्याचा विचार केल्यास जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९९० टक्के अर्थात २२२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पूर्व भागाला पावसाने झोडपून काढले आहे. त्यातच रविवारी बारामती, दौंड, इंदापूर तसेच मावळ तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. बारामती तालुक्यातील बारामती मंडळात १९४.८, माळेगाव मंडळात १०८.३ तर पणदरे ७०.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. या तालुक्यात रविवारी सरासरी ७७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
दौंडमध्ये देखील पावसाचा जोर मोठा होता. तालुक्यातील देऊळगाव मंडळात ७३.५, राहू मंडळात ६५.८ तर पारगाव मंडळात ११४.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. दौंडमध्ये रविवारी सरासरी ६४ मि.मी. पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे १३६.३, तर सणसर मंडळात १९४.८ मि.मी. पाऊस झाला आहे. हा आजवरचा मोठा पाऊस असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. इंदापूर तालुक्यात रविवारी ५६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. पुरंदर तालुक्यातही कुंभारवळण मंडळात ६५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. या तालुक्यात रविवारी सरासरी ४३.६ मि.मी. पाऊस झाला. मावळ तालुक्यातही पावसाचा जोर असून, ५ मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पंधरा घरांमध्ये शिरले ओढ्याचे पाणी
इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे पंधरा घरांमध्ये ओढ्याचे पाणी शिरले होते. तसेच निरगुडे येथे चाळीस, लाकडी येथे २, चिखली येथे १४ व तावशी येथे एकेका घरामध्ये पाणी शिरल्याची घटना घडली. बारामती तालुक्यात जळोची येथे रुपेश सिंह नावाची व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. त्याला बारामती नगरपालिका प्रशासन, एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने बाहेर काढले. काटेवाडी येथे घरात अडकून पडलेला सात जणांना प्रशासनाने बाहेर काढले.