पुणे : बारामतीसह तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी सहा तासांहून जास्त वेळ पावसाचे तांडव सुरू होते. काटेवाडी परिसरातील ढेकळवाडी येथे पावसाने धुमाकूळ घातला. संततधार मुसळधार पावसाने ओढ्याला महापूर आला. या पुराचे पाणी ओढ्या लगतच्या भागातील अनेक घरांमध्ये शिरले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रशासन व गाव कामगार तलाठी यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भवानीनगर, विजयनगरचा परिसर, ३५ फाटा, काटेवाडी परिसरातील दिपनगर, मासाळवाडी, बिरोबा माळ या परिसरातील पावसाचे पाणी शेरपूल नजीकच्या नाल्यातून ढेकळवाडी गावात येते. तसेच बारामती - इंदापूर रस्त्यावरील पताकाचा ओढाही तुडुंब भरून वाहत आहे, हे सर्व एकत्र पुराचे पाणी ढेकळवाडी येथील ओढ्याला मिळते. त्यामुळे मोठा फटका सहन करावा लागत आहे. ओढ्यालगतची झोपडपट्टी व काही घरे पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. घरात पाणी गेल्याने निवाऱ्यासाठी नारगिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. घरात पाणी घुसल्याने अन्नधान्य व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. भवानीनगर, ३५ फाटा, विजयनगर परिसरातून येणारे पाणी गावात घुसल्याने गावातील साखरेवाडा व मोठ्या संख्येने गावातील घरेही पाण्यात गेली आहेत.
मुसळधार झालेल्या पावसामुळे गावच्या कडेला पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे ढेकळवाडी काटेवाडी रस्ता बंद झाला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ता जलमय झाल्याने वाहतूकही ठप्प झाली होती. या संततधार पावसाने शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतात पाणी साचल्याने जनावरांच्या खाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
बारामती नीरा डावा कालवा फुटला..
बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे निरा डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फूटला आहे. कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. कालव्याचे पाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आले आहे. हा महामार्ग जलमय झाला आहे. खरबदारी म्हणून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी निरा डावा कालवा आहे. कालवा फुटून कालव्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घरामध्ये घुसून मोठे नुकसान झाले आहे. काटेवाडी भवानीनगर हा रस्ता तूर्तास बंद करण्यात आला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गाची एकाबाजूची वाहतूकही बंद
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. अवघ्या काही तासांत तब्बल ९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, पावसामुळे गावासह वस्त्यावरील नागरिकांचा संपर्क तुटला असून, पाण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रवाह वाहत असल्याचेही दिसून आले आहे. त्यासोबतच पुणे-सोलापूर महामार्गाची एकाबाजूची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले.
आंबेगावात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पावसाचे पाणी साचून शेततळी तयार झाली असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांची शेती पिके खराब होण्याच्या मार्गावर असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक टाव्हरेवाडी या गावांमध्ये गेल्या आठ दिवसांत चार ते पाच वेळा मुसळधार पाऊस पडल्याने ओढ्या नाल्यांना पाणी वाहू लागले आहे, तर विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. मात्र, सततचा पावसाने शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कोबी, फ्लॉवर, वांगी, मिरची, काकडी, बीट इत्यादी पिके शेतातून बाहेर काढता येत नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचे पैसे देऊन महिला मजुरांना घेऊन ही पिके बाहेर काढावी लागत आहेत. त्याचप्रमाणे, जनावरांचा हिरवा चारा गवत, मका, गाजर, कडवळ काढणेही मुश्कील झाले आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे कांदा पिकाचे, तसेच कुंभारवाड्यातील वीटभट्टी मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
यवतला १२० मिलिमीटर पाऊस
यवत व परिसरात मागील दोन दिवसात पावसाने कहर केला आहे. दोन दिवसात १२० मिलिमीटर पाऊस बरसला आहे. मागील महिनाभरात तीव्र उन्हाळा जाणवत होता. मे महिन्यात उन्हाच्या झळा आणखी सोसाव्या लागणार अशा मानसिकतेमध्ये सर्व शेतकरी व सर्वसामान्य नागरिक असताना अचानक पावसाने हजेरी लावली आहे.