Pune Railway Station: युजर चार्जेसचा निर्णय रद्द; आता प्रवासही महागणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 17:13 IST2021-10-20T17:13:16+5:302021-10-20T17:13:26+5:30
पुणे स्थानकासह देशभरातील रेल्वे स्थानक विकसित करण्याचे अधिकार आता रेल्वेने पुन्हा आपल्या ताब्यात घेतले असून आयआरएसडीसीला (indian railway station development corporation) घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Pune Railway Station: युजर चार्जेसचा निर्णय रद्द; आता प्रवासही महागणार नाही
प्रसाद कानडे
पुणे: पुणे स्थानकासह देशभरातील रेल्वे स्थानक विकसित करण्याचे अधिकार आता रेल्वेने पुन्हा आपल्या ताब्यात घेतले आहे. ‘आयआरएसडीसी’ च्या कामावर नाखूश होऊन त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या विकासाची जबाबदारी आता पुन्हा मध्य रेल्वेकडे आली आहे.
आता मध्य रेल्वे प्रशासन आपल्या स्तरावर निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करू शकणार आहे. तसेच रेल्वे स्थानक विकासासाठी रेल्वे प्रशासन प्रवाशांवर युजर चार्जेस लावण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे पूर्वी आयआरएसडीसी पुणे स्थानकावर युजर लावण्याचा घेतलेला निर्णय यामुळे रद्द होणार आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरचा रेल्वे प्रवास आता महागणार नाही. आयआरएसडीसीला मोठा दणका बसला असून, आता स्थानक विकसित करण्याच्या कामाला गती येईल, असे बोलले जात आहे.
आयआरएसडीसी (indian railway station development corporation) या संस्थेला पुणेसह देशभरातील महत्त्वाच्या स्थानकांचा विकास करण्याचे अधिकार दिले होते. मात्र, मागच्या सात ते आठ वर्षांत या संस्थेने केवळ गांधीनगर व हबिबगंज स्थानकाचा विकास केला. याव्यतिरिक्त त्यांनी कोणत्याही स्थानकाचा विकास केला नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालय आयआरएसडीसीच्या कामावर नाखूश होते. पुणे स्थानकाच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती होती. तीन वर्षांत पुणे स्थानकाचा डीपीआरदेखील तयार झाला नाही. अशा अनेक तक्रारी रेल्वे बोर्डाला प्राप्त झाल्या. परिणामी सोमवारी रेल्वे बोर्डाने आयआरएसडीसीला सर्व ठिकाणचे काम थांबविण्याचे आदेश दिले.