पुणे पोलिसांना घरांसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज; वशिलेबाजीला लागणार लगाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:03 IST2025-12-02T17:02:08+5:302025-12-02T17:03:03+5:30
प्रशासनाने पुढाकार घेत, घरांसाठी गुगलशीट आधारित एक ॲप्लिकेशन तयार केले असून, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर घरांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करता येणार

पुणे पोलिसांना घरांसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज; वशिलेबाजीला लागणार लगाम
पुणे :पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि विशेषत: कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने दिली जातात. पूर्वी यामध्ये वशिलेबाजीसह अन्य कारणांमुळे अनेकांना शासकीय घरे मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. आता प्रशासनाने पुढाकार घेत, घरांसाठी गुगलशीट आधारित एक ॲप्लिकेशन तयार केले असून, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर घरांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनाने मानवी हस्तक्षेप टाळण्यास प्राधान्य दिले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे ॲप्लिकेशन काही दिवसांतच सुरू होणार आहे.
पोलिस ठाण्याजवळ वास्तव्याला घर मिळावे, यासाठी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचादेखील अट्टाहास असतो. मात्र, अनेकदा पोलिस लाईनमधील घरांच्या संख्येपेक्षा कित्येक पटीने अर्ज प्रशासनाकडे प्राप्त होत होते. त्यामुळे पसंतीक्रम ठरवताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आता गुगलशीट ॲप्लिकेशन तयार केले आहे. त्यानुसार कोणत्याही कर्मचारी-अधिकाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने तत्काळ अर्ज करता येणार आहे. संबंधित ॲपचा क्यूआर कोड तयार केला असून, मंगळवारपासून (दि. २) प्रत्येक पोलिस ठाण्यात क्यूआर पाठवला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या मोबाईलद्वारे थेट कोड स्कॅन केल्यानंतर अर्ज मिळवून ऑनलाईनरीत्या अपलोड करता येणार आहे.
पोलिसांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी गुगलशीट बेस ॲप्लिकेशन तयार केले आहे. त्याद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून अर्ज करता येणार आहे. त्यानुसार पसंती आणि प्राधान्य क्रमानुसार अर्जदारांना घरे दिली जाणार आहे. - संजय पाटील, अपर पोलिस आयुक्त, प्रशासन