पुणे पोलिसांची मध्यप्रदेशमध्ये जाऊन मोठी कारवाई; पिस्तूलच्या कारखान्यावर छापा, ३० ते ४० जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 13:24 IST2025-11-22T13:23:53+5:302025-11-22T13:24:02+5:30
पुण्यात गुन्हेगारी वाढत असून वारंवार गावठी पिस्तूल आढळून येत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर हि कारवाई करण्यात आली आहे

पुणे पोलिसांची मध्यप्रदेशमध्ये जाऊन मोठी कारवाई; पिस्तूलच्या कारखान्यावर छापा, ३० ते ४० जण ताब्यात
पुणे : पुणे पोलिसांनी मध्यप्रदेशच्या उमरती गावात जाऊन मोठी कारवाई केली आहे. त्याठिकाणी असणाऱ्या गावठी पिस्तूलच्या कारखान्यावर छापा टाकला आहे. पोलिसांनी पिस्तूलसह दारू गोळाही जप्त केला आहे. तसेच ३० ते ४० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यात वारंवार पिस्तूल जप्त केल्या जात आहेत. अल्पवयीन मुले, गुन्हेगार, राजकीय नेते यांच्याकडून पिस्तूल जप्त केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या गावठी पिस्तूल मध्यप्रदेश मध्ये असणाऱ्या उमरती गावात तयार केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अशा वेळी त्यांनी थेट मध्यप्रदेश गाठून त्या कारखान्यावर छापा टाकला. व पिस्तूलसह दारुगोळा जप्त केला आहे. तसेच या पिस्तूल तयार करणाऱ्या ३० ते ४० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. किरकोळ कारणावरूनही पिस्तुलाचा धाक दाखवला जात आहे. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमारही केली जात आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अल्पवयीन मुले कोयत्याबरोबरच पिस्तूलचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. पोलीस तपासणीतही अनेक भागात गावठी पिस्तूल आढळून आले आहेत. अखेर त्याच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. या पिस्तूल येतात कुठून? याचा शोध घेत त्यांनी मध्यप्रदेशचे उमरती गाव गाठले. व त्याठिकाणी पिस्तूल तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला आहे.
पुणे पोलिसांच्या टीमने काल संध्याकाळी मध्य प्रदेशच्या दिशेने प्रवास सुरू केला. उमरती हे गाव पुण्यापासून साधारण ५०० किलोमीटर अंतरावर आहे. मध्य प्रदेश राज्यात प्रवेश केल्यानंतर पुढील आढावा घेतल्यावर आणि आदेश मिळाल्यावर पथके बरवानी जिल्ह्यात पोहचले. पोलिसांनी बुलेट प्रूफ जॅकेट परिधान केले होते. ड्रोन ने पहारा दिला होता. त्यानंतर टार्गेट केलेल्या कारखान्याचे ठिकाण सुद्धा लोकेट केले. पहाटेच्या गावात कोणाला काही थांगपत्ता लागू न देता पुणे पोलिसांच्या पथकाने मिळून आलेल्या कारखान्यांवर छापा टाकला. छापा टाकताच त्या ठिकाणी झोपलेल्या कामगारांना काय करावं सुचलं नाही. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या काही जणांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं. गाव छोटं असल्यामुळे गावात बहुतांश जणं हे अशा अनधिकृत शस्त्र बनवण्याच्या कारखान्यात काम करतात. या कारखान्यात काही महिलांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत १०० पेक्षा अधिक बॅरल, ५ मॅगझिन, १४ ग्रेंडिंग मशीन, २ पिस्तूल, ४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस दलातील अधिकाऱ्याने दिली. छापेमारी मध्ये पोलिसांनी बेकायदेशीर शास्त्रांचे साचे तयार करण्यासाठी आणि निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ५० भट्ट्या घटनास्थळी उद्ध्वस्त केल्या. शस्त्रांवर एम्बॉसिंग करण्यासाठीचे साहित्य सुद्धा या कारवाई मध्ये जप्त करण्यात आले आहे.