ZP School : बंद पडण्याच्या मार्गावर असलेली झेडपीची शाळा, आता जगातील सर्वोत्तम १० शाळांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:23 IST2025-06-21T14:22:15+5:302025-06-21T14:23:00+5:30

जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेचा वर्ल्ड बेस्ट स्कूल्स यादीत समावेश; भारतातील एकमेव शाळा ठरली

PUNE NEWS ZP School Jalindarnagar Taluka Khed which was on the verge of closure, is now among the top 10 schools in the world | ZP School : बंद पडण्याच्या मार्गावर असलेली झेडपीची शाळा, आता जगातील सर्वोत्तम १० शाळांमध्ये

ZP School : बंद पडण्याच्या मार्गावर असलेली झेडपीची शाळा, आता जगातील सर्वोत्तम १० शाळांमध्ये

पुणे : खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. टी फोर एज्युकेशन या नामवंत संस्थेच्या जागतिक वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज या स्पर्धेत जगभरातील लाखो शाळांमधून या शाळेने सर्वोत्तम १० शाळांमध्ये स्थान मिळवणारी भारताची एकमेव शाळा ठरली असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस शाळेच्या विद्यार्थिनी सुप्रिया दौंडकर, सह्याद्री पाटील, ग्रामस्थ चांगदेव झोंडगे, आशुतोष वाघ, मयूर कदम आदी उपस्थित होते. दत्तात्रय वारे म्हणाले, "टी फोर एज्युकेशन संस्थेमार्फत दरवर्षी ‘वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज’ ही स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या विभागात सहभाग घेतला होता. जगभरातील लाखो शाळांमधून जालिंदरनगर शाळेची निवड झाली असून, भारतातून ही एकमेव शाळा अंतिम फेरीत पोहोचली आहे. या अंतिम टप्प्यात १० शाळांपैकी एक शाळा ‘सर्वोत्तम शाळा’ म्हणून निवडली जाणार असून, विजेत्या शाळेला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

पूर्वी बंद पडण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा आता अशा पातळीवर पोहोचली आहे की काही शहरांतील पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खेड्यात परतले आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, गुणवत्ता यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. या यशात मुख्याध्यापक संदीप मसुडगे गुरूजी, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद प्रशासन, व स्थानिक नागरिकांचा मोलाचा वाटा आहे.शाळेचा पुढील प्रवास अधिक बळकट करण्यासाठी नागरिकांनी https://vote.worldsbestschool.org/publicvote25/entry/2649 या संकेतस्थळावर जाऊन मतदान करावे, ९ जुलैपर्यंत मतदान करता येणार असून निकाल ऑक्टोबर महिन्यात जाहीर होणार असल्याचेही वारे यांनी सांगितले.
 
बक्षीस मिळवणे हा उद्देश नाही

बक्षीस मिळवणे हा उद्देश नव्हता, तर सरकारी शाळांमध्येही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळू शकते, हे दाखवण्यासाठी आम्ही या स्पर्धेत भाग घेतला. जालिंदरनगर शाळा ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या श्रेणीत सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांना फ्रेंच, जर्मनसारख्या परदेशी भाषा शिकवल्या गेल्या. एक हजार पर्यंतच्या पाठांचे सहज म्हणणे, इस्त्रोसोबतचा शैक्षणिक करार, उपग्रह निर्मितीचा अभ्यास या सर्व उपक्रमांनी शाळेचा दर्जा वेगळ्याच उंचीवर पोहोचवला असल्याचेही मुख्याध्यापक दत्तात्रय वारे म्हणाले.

Web Title: PUNE NEWS ZP School Jalindarnagar Taluka Khed which was on the verge of closure, is now among the top 10 schools in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.