पुणे / केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान पोटात झालेल्या रक्तस्त्रावामुळे २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. रंजना बाबू केसकर (रा. खोर, ता. दौंड) असे मृत महिलेचे नाव आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रजा घेतली. मात्र, हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच पुन्हा त्यांना कामावर हजर राहण्याचे मुख्यालयातून आदेश देण्यात आले. याशिवाय संबंधित महिलेवर खासगी रुग्णालयातही उपचार करण्यात आले. मात्र, यासंदर्भात लेखी माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दौंड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (दि. २५) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. सकाळी सुमारे नऊ वाजता रंजना केसकर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटात रक्तस्त्राव सुरूच राहिला. त्यानंतर शल्यचिकित्सक डॉ. अनिल कदम यांनी टाके टाकून पुढील शस्त्रक्रियेसाठी नानगाव येथील आरोग्य केंद्राकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
रंजना केसकर यांचा रक्तदाब झपाट्याने कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा लोखंडे यांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढे पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी मृत महिलेच्या संतप्त नातेवाइकांनी केडगाव आरोग्य केंद्रात गोंधळ घालत जबाबादार डॉक्टरवर कारवाईची मागणी केली.
याप्रकरणी अद्याप यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी नीलिमा लोखंडे म्हणाल्या, रक्तस्त्राव थांबत नसल्याने रुग्णाची प्रकृती गंभीर झाली होती. आम्ही स्वतः कार्डियाक रुग्णवाहिकेतून त्यांना ससून रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची लेखी माहिती वरिष्ठांना कळवलीच नाही
नियमानुसार रंजना केसकर प्रकरणाची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना लेखी माहिती कळवणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता केवळ तोंडी माहिती दिली. तसेच यवत पोलिस ठाण्यात डॉ. कदम यांच्या विरोधात सुमोटो दाखल करण्याची गरज असताना तसे काहीही न करता संबंधित वैद्यकीय अधिकारी थेट रजेवर गेल्या. प्रकरण अंगलट येताच वरिष्ठांनी त्यांना कामावर हजार राहण्याचे आदेश दिले.
यवत पोलिसांची मध्यस्थी ?
रंजना यांच्या मृत्यूनंतर सोमवारी नातेवाइकांनी आरोग्य केंद्रात गोंधळ घालत पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी डॉ. कदम हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, संपूर्ण केसकर कुटुंबीय आणि डॉ. कदम हे दिवसभर यवत पोलिस ठाण्यात होते. मात्र, सायंकाळी तक्रार दाखल न करताच कुटुंबीय तेथून निघून गेले. यामुळे नक्की पोलिस ठाण्यात काय घडले, याबाबत उलटसुलट चर्चा स्थानिक नागरिकांतून सुरू झाली आहे.
चौकशी समितीची नियुक्ती
रंजना केसकर प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी पाच जणांची समिती नियुक्त केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांनी दिली. रंजना केसकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होईल. तसेच चौकशी समितीच्या अहवालतून निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधित डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. हंकारे यांनी स्पष्ट केले.
आरोग्य केंद्रात १९ शस्त्रक्रिया
कुटुंब नियोजनाच्च्या शस्त्रक्रियेसाठी महिन्यातून एकदा जिल्ह्यात शिबिराचे आयोजन केले जाते. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात २५, तर ग्रामीण रुग्णालयात ५० शस्त्रक्रिया केल्या जातात. केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घटनेच्या दिवशी १९ शस्त्रक्रिया केल्या होत्या.
Web Summary : A 22-year-old woman died due to excessive bleeding after a family planning surgery at Kedgaon center. Relatives protested, alleging negligence. An investigation is underway.
Web Summary : दौंड के केडगाव केंद्र में परिवार नियोजन सर्जरी के बाद 22 वर्षीय महिला की अत्यधिक रक्तस्राव से मौत हो गई। परिजनों ने लापरवाही का आरोप लगाते हुए हंगामा किया। जांच जारी है।