प्रेमाचे नाटक करून व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:59 IST2025-10-03T19:57:55+5:302025-10-03T19:59:08+5:30
- अंत्यसंस्कारानंतर त्यांना गावातील दोघा भावा-बहिणींनी प्रेमाचे नाटक करून त्यांच्यासोबत काढलेले अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले.

प्रेमाचे नाटक करून व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
पुणे : बालाजीनगर येथे किराणा दुकान असणाऱ्या एका व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर नातेवाइकांनी राजस्थानमधील गावी जाऊन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारानंतर त्यांना गावातील दोघा भावा-बहिणींनी प्रेमाचे नाटक करून त्यांच्यासोबत काढलेले अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाबुराम मंगाराम चौधरी (४३, रा. बालाजी ट्रेडर्स, के. के. मार्केट, बालाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचे भाऊ हरिशचंद्र मंगाराम चौधरी (४२, रा. भाभ्भुओं की ढाणी, बैठवासिया, ता. ओसिया, जि. जोधपूर, राजस्थान) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तुलसी उर्फ चुकी भुराराम जान्दु (२६) आणि मुकेश भुराराम जान्दु (२४, दोघेही रा. चैनाणियो की ढाणी, भटियाणी जी का थान रायमलवाडा, ता. बापिणी, जि. फलोदी, राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एक ते दोन वर्षांपासून २१ जुलै २०२५ दरम्यान सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराम चौधरी यांचे बालाजीनगरमध्ये बालाजी ट्रेडर्स या नावाने किराणा दुकान होते. त्यांना तुलसी व मुकेश यांनी प्रेमाचे खोटे नाटक करून त्यांच्यासोबत फोटो काढले. हे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर या दोघांनी राजस्थानमधील आपल्या गावाकडील सोनाराकडून सोन्याचे दागिने खरेदी केले. त्याचे पैसे बाबुराम चौधरी यांना देण्यास भाग पाडले, अशा प्रकारे त्यांनी सोन्याचे दागिने, मोबाइल खरेदी केले. त्याचे बिल बाबुराव चौधरी यांना देण्यास लावले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मनी ट्रान्सफरद्वारे बळजबरीने लाखो रुपये उकळले.
या मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून त्यांनी २१ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे नातेवाइक अंत्यसंस्कारासाठी गावी गेले. अंत्यसंस्कारानंतर गावातील लोक त्यांना भेटायला येत. त्यातून फिर्यादी यांना बाबुराम चौधरी यांच्या आत्महत्येमागील कारण समजले. त्यांनी गावातील सोनार व इतरांकडे चौकशी केल्यावर त्यांची खात्री झाली. त्यानंतर आता ४५ दिवसांनी ते पुण्यात आले व त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक कल्पना काळे पुढील तपास करत आहेत.