उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपीचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:33 IST2025-04-16T14:24:09+5:302025-04-16T14:33:09+5:30
अजित पवार यांना निमंत्रण न देण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपीचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
पुणे - पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य ‘धनगरी नाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात तब्बल ५०,००० धनगरी ढोल वाजवणार आहे, महाराष्ट्रातील विविध भागांतील धनगर बांधव यात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र निमंत्रण दिलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, हा कार्यक्रम सरकारचा नाही, धनगर समाजाचा आहे. समाजाच्या भावना आणि निर्णय यानुसारच कोणाला बोलवायचं हे ठरतं. त्यामुळे अजित पवार यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही. अजित पवार यांना निमंत्रण न देण्याच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
यावेळी ‘फुले’ चित्रपटाविषयीही त्यांनी मत व्यक्त करताना राज्यात सध्या जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत सुरू झाली आहे. सत्ता गेली की नवीन इतिहासकार जन्माला येतात. यांच्यावर सरकारने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी केली.
अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवींचं कार्य जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. त्या काळात महिलांनी केलेलं राज्यकारभाराचं काम हे प्रेरणादायी आहे. त्यामुळे धनगर समाजाने ठरवलं आहे की त्यांचं स्मरणही भव्य आणि अभूतपूर्व पद्धतीने व्हावं." या कार्यक्रमात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद होईल असा प्रयत्न केला जाणार असून, सुमारे ५०० गजर मंडळं सहभागी होणार आहेत. एक गजर मंडळ सुमारे ५० कलाकार घेऊन येणार आहे.
"ढोल म्हणजे शक्तीचा नाद, भक्तीचा आवाज, आणि जनतेचा हुंकार
धनगर समाजातील परंपरा, चालीरीती, ढोल वादनाची सांस्कृतिक समृद्धी आणि समाज संघटन या सगळ्यांचा संगम या कार्यक्रमात होणार आहे. "हे नुसतं ढोल वादन नाही, तर संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे," असं सांगत त्यांनी राज्यातील सर्व धनगर बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केलं.