Weather update : पुण्यात कूल कूल..!गुढीपाडव्याला पावसाची सर ? अनेक जिल्ह्यांत अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:29 IST2026-03-17T10:28:47+5:302026-03-17T10:29:04+5:30
वाशिम चाळिशी पार, तर पुण्यात सर्वांत कमी किमान तापमान

Weather update : पुण्यात कूल कूल..!गुढीपाडव्याला पावसाची सर ? अनेक जिल्ह्यांत अंदाज
पुणे : सध्या राज्यामध्ये उन्हाचा कडाका जाणवत असताना तापमानात घट होऊन पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आजपासून (दि. १६) २० मार्चपर्यंत राज्यामध्ये कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वाशिममध्ये ४०.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले तर सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात १६.४ अंशाची नोंद झाली.
दोन दिवसांवर गुढीपाडवा आला आहे. गुढीपाडव्यापासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल होऊन अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. या जिल्ह्यांमध्ये अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचाही अंदाज आहे. त्यामध्ये बुधवारी (दि. १८) रोजी अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये किरकोळ गारपीट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर या १३ जिल्ह्यांमध्ये काहीशी उष्णता जाणवेल. तसेच रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी दिला आहे.
राज्यातील सोमवारचे तापमान :
ठिकाण : कमाल किमान
पुणे : ३५.४ : १६.४
जळगाव : ३६.७ : २०.७
कोल्हापूर : ३५.८ : २०.९
महाबळेश्वर : २८.८ : १७.४
नाशिक : ३४.१ : १६.५
सांगली : ३६.५ : २०.८
सोलापूर : ३९.३ : २३.४
मुंबई : ३२.४ : २५.५
रत्नागिरी : ३२.० : २१.६
धाराशिव : ३८.८ : ००
परभणी : ३८.४ : २०.८
बीड : ३९.२ : ००
अकोला : ३८.९ : २१.८
चंद्रपूर : ३७.४ : २४.२
नागपूर : ३७.६ : २०.२
वाशिम : ४०.५ : १८.६
वर्धा : ३९.४ : २१.२
पुण्यात कूल कूल!
पुण्यामध्ये दोन दिवसांपासून किमान तापमानात घट झाली असून, कमाल तापमानातही ३-४ अंशाने घट पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात कमाल तापमान ३८ अंशापर्यंत गेले होते. तेच आता ३५.४ अंशावर आले आहे. सोमवारी तर सर्वांत कमी किमान तापमान पुण्यातच १६.४ अंशावर नोंदवले गेले.