आमचे ठरले...राज्यात सरकार म्हणून आम्ही एक आहोत - चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:01 IST2025-11-26T08:59:33+5:302025-11-26T09:01:58+5:30
- बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतिसुमने

आमचे ठरले...राज्यात सरकार म्हणून आम्ही एक आहोत - चंद्रशेखर बावनकुळे
पुणे : मत देणे हा तुमचा अधिकार आहे, मत दिले तर ठीक, नाहीतर मी अर्थमंत्री आहे. कुणाला कुठे किती निधी द्यायचा हा माझा अधिकार आहे, तुम्ही काट मारली तर मीही काट मारेन, असे वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर पुणे येथे एका कार्यक्रमात मंगळवारी बावनकुळे म्हणाले की, अजित पवार यांनी बारामतीत गेली अनेक वर्षे काम केले आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्याने मतदारसंघाचा विकास जास्त होतोच, कोणीही असेल तरी असे करेलच, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळत बावनकुळेंनी पाठराखण केली.
राज्यातील निधी वाटपाचे पूर्ण अधिकार मुख्यमंत्री यांना असले तरी सरकार म्हणून आमचे ठरले आहे, की निधी समान वाटप करण्यात येत असून राज्यात सरकार म्हणून आम्ही एक आहोत, असे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.
- ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षणाला पाठिंबा
२८८ नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुती दोन तृतीयांश बहुमताने ५१ टक्क्यांच्या वर मते घेऊन निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करीत येत्या मनपा निवडणुकीबाबत कोर्टाचा निर्णय शुक्रवारी येईल. ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष आहे. तसेच शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू यांनी निवडणूक झाल्यानंतरच आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. आता एक वर्षानंतर बोलून काही उपयोग नाही, असाही बावनकुळे यांनी शहाजी बापू यांना टोमणा दिला.