सत्ताधारी आमदारच नाराज; भाजपच्या राज्यात निधीचा मोठा गफला;विश्वजीत कदमांचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:05 IST2025-08-12T17:03:07+5:302025-08-12T17:05:38+5:30
आमदार संजय गायकवाड यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार जाहीरपणे केली. गायकवाड सत्ताधारी पक्षातील आहेत.

सत्ताधारी आमदारच नाराज; भाजपच्या राज्यात निधीचा मोठा गफला;विश्वजीत कदमांचे आरोप
पुणे: विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार सत्ताधारी पक्षातील आमदारच करत आहेत, ही तक्रार म्हणजे राज्य सरकारमध्ये निधीचा मोठा गफला सुरू असल्याचे दिसते अशी टीका माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी केली.
पक्षाने खडकवासला इथे आयोजित केलेल्या प्रदेश कार्यकारिणी प्रशिक्षण शिबिरासाठी कदम आले होते. पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, आमदार संजय गायकवाड यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार जाहीरपणे केली. गायकवाड सत्ताधारी पक्षातील आहेत. तेच नाही तर असे अनेक नाराज आमदार तिथे आहेत. सरकार सांगते आहे की अंदापत्रकात तरतुद केली आहे, मात्र तरतुद केली याचा अर्थ पैसे दिले असा होत नाही. त्यामुळेच हे पैसे मग जातात कुठे असा प्रश्न निर्माण होतो.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये प्रशासक आहेत. लोकप्रतिनिधी नाहीतच. पैसे येतात किती, जातात किती, कोणती कामे होतात याची सगळी माहिती फक्त प्रशासकाला असते. ते सरकारचे ऐकत असतात. यातून निधीचा मोठा गफला होत असल्याचा संशय निर्माण होतो असे कदम म्हणाले.
विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण महाराष्ट्रातील स्थिती अवघड झाली आहे. प्रमूख रस्ते, जोड रस्ते खराब झाले आहेत. वारंवार मागणी केल्यानंतरही ते दुरूस्त होत नाहीत. निधी येतोय, मिळेल असेच सांगण्यात येते अशी माहिती कदम यांनी दिली.