स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरतानाच हाेणार कागदपत्रांची पडताळणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:27 IST2025-10-12T12:27:03+5:302025-10-12T12:27:24+5:30
- राज्यभरात एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर ४ जानेवारी २०२६ राेजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यात उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक असे एकूण ९३८ पदे भरली जाणार आहेत.

स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरतानाच हाेणार कागदपत्रांची पडताळणी
पुणे : राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत एकूण ९३८ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, संभाव्य बनावट प्रमाणपत्रांचा वापर टाळण्यासाठी आयाेगाकडून अर्ज सादर करायच्या वेळेसच प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.
राज्यभरात एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर ४ जानेवारी २०२६ राेजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यात उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक असे एकूण ९३८ पदे भरली जाणार आहेत.
या संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालावरून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. या पूर्व परीक्षेकरिता २७ ऑक्टोबरपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर आहे.
याबाबत स्पर्धा परीक्षार्थी नितीन आंधळे यांनी सांगितले की, नोकर भरतीत मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्रांचा वापर झाल्याचे वारंवार निदर्शनास आले. परिणामी त्यातील काही भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. ही बाब विचारात घेऊन राज्य लाेकसेवा आयाेगाने नवीन नियमावली करत अर्ज सादर करायच्या वेळेसच प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना निश्चितच न्याय मिळेल. या निर्णयामुळे नोकर भरतीतील गैरप्रकार थांबून निवड प्रक्रियेला गती मिळेल. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहेत.