पुणे : शहर व परिसरात गुरुवारी (दि. २) दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे अनेक अतिउच्चदाब व उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड झाला. परिणामी, अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर परिश्रम घेत होते. अनेक भागांचा बाधित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरु करण्यात आला.साधारणत: तासभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहिन्यांवर झाडे पडली. तर काही ठिकाणी फिडर बॉक्स पाण्यात गेल्यामुळे वीज वाहिन्या बंद पडल्या. तर विजेच्या कडकडाटामुळेही काही ठिकाणी वीज वाहिन्या बाधित झाल्या. कोथरुड भागात कुंदननगरी फिडरवर विजेच्या कडकडाटामुळे आकाशातील विजेला अटकाव करणारी यंत्रणा बाधित झाली. त्यामुळे संबंधित वाहिनीचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. मात्र पर्यायी मार्गाने या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. नांदेड सिटी अतिउच्चदाब वाहिनीवर ट्रिपिंग आल्यामुळे अर्ध्या तासासाठी कोथरुड विभागातील वीजपुरवठा बाधित झाला होता. पाऊस थांबताच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. शिवाजीनगर विभागातील विद्यापीठ, खडकी, बावधन, बाणेर, शिवाजी हाऊसिंग सोसायटी या वाहिन्यांचा वीजपुरवठा बाधित झाला असून विद्यापीठ वाहिनी सुरु करण्यात यश मिळाले.
पर्वती या भागातील महावितरणच्या जुन्या पर्वती वीज उपकेंद्रातील फिडरवर झाड पडले होते. त्याला हटवून वीजपुरवठा सुरु करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. तर प्रयेजा व मधुकोश वाहिनीच्या इनकमिंग फिडर बॉक्स भागात पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. खडकवासला, श्रवण वाहिनीच्या पेट्रोलिंगचे काम हाती घेण्यात आले होते.
बंडगार्डन विभागात वडाचीवाडी या उपरी वीज वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्याने त्या भागातील वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला. तर वाडिया वाहिनीला तासाभरातच पर्यायी मार्गाने सुरु करण्यात आले. रास्ता पेठ विभागातील कोंढवा, येवलेवाडी या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीवर परिणाम झाल्याने या भागातील वीजपुरवठा देखील बाधित झाला. या व्यतिरिक्त काही भागात लघुदाब वाहिन्यांवर देखील पावसाचा परिणाम झाला असण्याची शक्यता महावितरणने व्यक्त केली.
येथे करा तक्रार
ग्राहकांनी विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींसाठी महावितरणच्या १९१२, १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. महावितरणच्या मोबाईल ॲपवर देखील सर्व सुविधा २४ तास उपलब्ध आहेत. तसेच ९१६७७७७७९१ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारेदेखील तक्रार करण्याचा नवीन पर्याय उपलब्ध आहे.
Web Summary : Heavy rains and storms in Pune caused widespread power outages due to damaged power lines and fallen trees. Power restoration efforts are underway; report issues to the toll-free numbers provided.
Web Summary : पुणे में भारी बारिश और तूफान से बिजली लाइनों को नुकसान पहुंचा और पेड़ गिरने से व्यापक बिजली कटौती हुई। बिजली बहाल करने के प्रयास जारी हैं; टोल-फ्री नंबरों पर समस्याओं की रिपोर्ट करें।