रेल्वेमार्गांवरील कामांमुळे गाड्यांचा वेग मंदावला;झेलम, आझाद हिंद, सांत्रागाची आणि दानापूरला सात तास उशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:50 IST2025-12-26T16:48:56+5:302025-12-26T16:50:16+5:30
पुण्यातूून दिल्ली, पाटणा, कोलकाता, इंदूर, जबलपूर आणि कन्याकुमारी व इतर भागांत महत्त्वाच्या रेल्वेगाड्या धावतात

रेल्वेमार्गांवरील कामांमुळे गाड्यांचा वेग मंदावला;झेलम, आझाद हिंद, सांत्रागाची आणि दानापूरला सात तास उशीर
पुणे : पुणे विभागातून धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उशीर होत आहे. शिवाय अनेक विभागांत रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. दुसरीकडे सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. पुण्यात येणाऱ्या हजरत निझामुद्दीन, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-सांत्रागाची आणि दानापूर या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना सात ते आठ तास उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पुण्यातूून दिल्ली, पाटणा, कोलकाता, इंदूर, जबलपूर आणि कन्याकुमारी व इतर भागांत महत्त्वाच्या रेल्वेगाड्या धावतात. काही वेळा गाड्यांना सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबवाव्या लागतात. यामुळे पुढील स्थानकांवर पोहोचण्यासाठी उशीर होतो. यामुळे सर्व गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होत आहे. तसेच बिलासपूर विभागात जोडणीचे काम सुरू आहे. शिवाय इतरही विभागांत तिसऱ्या आणि चाैथ्या लाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेगावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेमध्ये बराच वेळ अडकून पडावे लागत आहे. मुख्य स्थानकातून गाडी वेळेवर निघूनसुद्धा मार्गावर काम सुरू असल्यामुळे रेल्वेगाड्यांना पुढे सिग्नल मिळत नाही; परंतु पुणे विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या या वेळेवर निघतात, पुढील मार्गावर सिग्नल न मिळाल्याने गाड्यांना उशीर होत आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सात तास होतोय उशीर...
झेलम, हावडा, आझाद हिंद आणि दानापूर या प्रमुख गाड्या पुणे विभागातून धावतात. परंतु बिलासपूर व इतर विभागांत कनेक्टिव्हिटीचे काम सुरू आहे. तसेच खांडवा विभागात नव्या रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या गाड्यांना सातत्याने उशीर होत आहे. या सर्व प्रमुख गाड्यांना पुण्यात पोहोचायला शुक्रवारी सात तासांपर्यंत उशीर झाला आहे.
प्रवाशांचा वेळ वाया...
रेल्वेगाड्या या निश्चित वेळेत धावतात. असे असले तरी अलीकडे अनेक वेळा विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या नियोजनावर परिणाम होत असून, जादा वेळ रेल्वे प्रवासात जात असल्याने पुढचे नियोजन बिघडत आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या कधी वेळेवर धावणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सांत्रागाची ही महत्त्वाची आणि सुपरफास्ट गाडी आहे; परंतु या गाडीला अलीकडे वारंवार उशीर होत आहे. त्यामुळे लांबून येणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे गाड्यांची वेळ रेल्वे प्रशासनाकडून पाळण्यात यावी. - रामदास सकट, प्रवासी