मोठा अनर्थ टळला...! रेल्वेच्या चाकाला आग लागल्याने एक तास खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:08 IST2025-09-10T10:08:36+5:302025-09-10T10:08:56+5:30
- डबा बदल करून पहाटे पाच वाजता गाडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. तत्काळ गाडी थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मोठा अनर्थ टळला...! रेल्वेच्या चाकाला आग लागल्याने एक तास खोळंबा
पुणे : मुंबईवरून पंढरपूरला जाणाऱ्या गाडी क्रमांक (११०२७) च्या जनरल कोचच्या एका चाकाला घर्षणाने मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली. लोकोपायलटच्या लक्षात आल्याने तत्काळ गाडी थांबविण्यात आली. त्यानंतर डब्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. डबा बदल करून पहाटे पाच वाजता गाडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. तत्काळ गाडी थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मुंबई-पंढरपूर निर्धारित वेळेत आणि वेगात धावत होती. पुण्यावरून ही गाडी पुढे गेल्यावर हाॅट ॲक्सल बाॅक्स डिटेक्टरमध्ये चाकाचे तापमान वाढून आग लागली होती. ही घटना लोकोपायलटच्या लक्षात आले. त्यानंतर पुणे विभागातील नियंत्रण कक्षाला ही माहिती देण्यात आली.
त्यानंतर तत्काळ टीम रवाना झाली. ज्या डब्याच्या चाकाला आग लागली होती, तो डबा बदलण्यात आला. प्रवाशांच्या सोयीसाठी दुसरा डबा जोडण्यात आला. त्यानंतर पहाटे पाच वाजता गाडी पुढे मार्गस्थ झाली.