कडक ऊन, पाऊस अन् सकाळी-रात्री थंडी; बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:40 IST2026-03-21T09:40:34+5:302026-03-21T09:40:54+5:30
तापमानातील अचानक चढ-उतारामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी

कडक ऊन, पाऊस अन् सकाळी-रात्री थंडी; बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले
पुणे : शहरासह जिल्ह्यात सध्या दिवसा कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक झालेला अवकाळी पाऊस आणि पहाटे व रात्री जाणवणारी थंडी अशा विचित्र हवामान बदलांचा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. या अस्थिर वातावरणामुळे विविध आजारांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तापमानातील अचानक चढ-उतारामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे व्हायरल संसर्ग, सर्दी-खोकला, ताप, घसा दुखणे यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. याशिवाय उष्णतेमुळे घाम अधिक येत असल्याने त्वचेचे संसर्ग, तसेच दूषित पाणी आणि अन्नामुळे पोटाचे विकारही वाढले आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून दमा, मधुमेह किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांमध्ये या तक्रारी गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकंदरीतच वातावरणातील अनिश्चिततेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून, नागरिकांनी सजग राहून आवश्यक ती काळजी घेतल्यास या आजारांपासून बचाव करणे शक्य आहे.
बदलत्या वातावरणात आढळणाऱ्या प्रमुख तक्रारी :
सर्दी, खोकला, व्हायरल ताप, घशातील संसर्ग, ॲलर्जी, दमा वाढणे, जुलाब-उलट्या, पोटदुखी, त्वचारोग, तसेच उष्माघात (हीट स्ट्रोक). काही ठिकाणी डोळ्यांचे संसर्ग आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येतही वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
आजारांच्या वाढीची कारणे :
तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीमागे काही ठळक कारणे आहेत. हवामानातील अनियमित व जलद बदल. उष्णता आणि आर्द्रतेमुळे जिवाणू व विषाणूंची वाढ. पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित होणे. थंड आणि गरम वातावरणातील सतत बदल. अयोग्य आहार, उघड्यावरचे अन्न आणि अपुरी झोप.
उपचार व वैद्यकीय सल्ला :
लक्षणे दिसताच विलंब न करता उपचार घेणे आवश्यक आहे. ताप, सर्दी किंवा खोकल्यासाठी योग्य औषधी वेळेवर घ्यावीत. जुलाब किंवा उलट्या झाल्यास शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी ओआरएस आणि द्रवपदार्थ घ्यावेत. ॲलर्जी किंवा दम्याच्या रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमित घ्यावीत. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी आणि पाणी, ताक, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावेत. स्वतःहून औषधी घेणे टाळावे, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
घ्यावयाची काळजी :
दिवसातून पुरेसे म्हणजे किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. ताजे व स्वच्छ अन्न सेवन करावे. उघड्यावरचे व शिळे अन्न सेवन कटाक्षाने टाळावे. उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्री, डोळ्यावर गॉगल वापरावा. सोबत बाटलीबंद पाणी बाळगावे. हवामानानुसार कपड्यांची निवड करावी. हातांची स्वच्छता राखणे, पुरेशी झोप व नियमित व्यायाम, अशा सवयी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
हवामानातील बदलांमुळे सर्दी, खोकला आणि श्वसनमार्गाचे आजार वेगाने वाढतात. थंड-गरम वातावरणात सतत ये-जा केल्याने घसा दुखणे, टॉन्सिल्स सुजणे आणि नाक बंद होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. धूळ, परागकण आणि आर्द्रतेमुळे ॲलर्जी वाढते. सर्दी झाल्यानंतर दुर्लक्ष केल्यास सायनसचा त्रास वाढू शकतो. अशावेळी कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. थंड पाणी, आइस्क्रीम व थंड पेये टाळावीत. धुळीत किंवा प्रदूषणात मास्क वापरावा. सर्दी-खोकला दीर्घकाळ टिकल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. राहुल तेलंग, ईएनटी तज्ज्ञ, ससून
बदलत्या हवामानामुळे शरीरावर ताण येतो आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता होऊन थकवा, चक्कर येणे, उष्माघात होऊ शकतो. दूषित पाणी व अन्नामुळे जुलाब, उलट्या आणि पोटदुखी वाढते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास व्हायरल तापाचा धोका वाढतो. यासाठी दिवसातून ३–४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ओआरएस, लिंबूपाणी, ताक यांसारखे द्रवपदार्थ घ्यावेत. ताजे व स्वच्छ अन्न सेवन करावे. ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत. पुरेशी झोप व संतुलित आहार घ्यावा. - प्रा. डॉ. हरिदास प्रसाद, विभाग प्रमुख, औषधीशास्त्र विभाग, ससून.