दोन भावांचा 'गोलमाल'; सख्या भावाला पोलिस करण्यासाठी उपनिरीक्षकानेच दिली परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:00 IST2025-12-03T18:59:45+5:302025-12-03T19:00:56+5:30
भावाच्या जागी दिलेली 'डमी' परीक्षा पोलिस भावालाच अखेर भोवली

दोन भावांचा 'गोलमाल'; सख्या भावाला पोलिस करण्यासाठी उपनिरीक्षकानेच दिली परीक्षा
पुणे : एका भावासाठी दुसरा भाऊ वाट्टेल ते करू शकतो हे आजवर आपण पाहिले आणि ऐकले आहे. पण सख्ख्या भावाला पोलीस करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये थेट भावाच्या जागी बसून लेखी परीक्षा दिली. अखेर नऊ वर्षांनी भावांचा हा 'गोलमाल' समोर आल्याने या उपनिरीक्षकाला पुणे पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे असे कोठडी झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्यासह भाऊ गजानन शिवलाल गुसिंगे (दोघे रा. रा. कौचलवाडी, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरोधात तोतयेगिरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासविणे, कट रचणे या भारतीय दंड संहितेच्या कलमांसह परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल २०१६ रोजी सकाळी सहा वाजता शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर घडली.
२०१६ मध्ये पुणे शहर पोलिस दलातर्फे भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत आरोपी गजानन गुसिंगे सहभागी झाला. त्याने मैदानी चाचणी परीक्षा दिली. त्यानंतर २४ एप्रिलला लेखी परीक्षेसाठी स्वतःऐवजी 'डमी' व्यक्तीला बसविले. त्यासाठी चक्क बनावट ओळखपत्रेही तयार केली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी गजाननचा आणि त्याच्या जागी परीक्षा देणाऱ्या तोतया व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेकडून या दोघांचा शोध घेतल्यावर त्याच्या जागी परीक्षा देणारा गजाननचा सख्खा भाऊ सुप्पडसिंग असल्याचे एका साक्षीदाराकडून समोर आले.
दरम्यानच्या काळात सुप्पडसिंग महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून माहिती मागविली असता, सुप्पडसिंगची २०२३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली असून, तो सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नियुक्त असल्याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा झाल्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज्य राखीव दल गट क्रमांक सात येथून आरोपी सुप्पडसिंगला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. आरोपी गजाननचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी बनावट ओळखपत्र कुठून तयार केली, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सहायक निरीक्षक दादासाहेब पाटील आणि सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. चेतन भुतडा यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपी उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.