महापौर पक्षाचे नव्हे, पुणे शहराचे आहेत; आंदोलनात सहभाग घेणे चुकीचेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:45 IST2026-02-18T13:35:01+5:302026-02-18T13:45:10+5:30

- नागरिकांची व राजकीय मंडळीची महापौरांच्या कृतीवर नकारात्मक प्रतिक्रिया

pune news The mayor belongs to the city, not the party; it is wrong to participate in the protest | महापौर पक्षाचे नव्हे, पुणे शहराचे आहेत; आंदोलनात सहभाग घेणे चुकीचेच

महापौर पक्षाचे नव्हे, पुणे शहराचे आहेत; आंदोलनात सहभाग घेणे चुकीचेच

पुणे : सामाजिक हितासाठी होणाऱ्या आंदोलनामध्ये महापौरांनी सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे. एखाद्या हिंसक आंदोलनात सहभागी होणे, हे महापौरपदाच्या गरीमेला बाधा पोहचवणारे आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या आंदोलनात महापौरांनी सहभाग घेणे चुकीचे आहे. महापौर या शहराच्या प्रथम नागरिक आहेत. आता त्या कुण्या एका पक्षाच्या नाहीत. त्यांनी यापुढे काळजी घ्यायला हवी, अशा प्रतिक्रिया पुणेकर नागरिकांनी दिल्या आहेत. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने रविवारी काँग्रेसभवन जवळ आंदोलन केले. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महापौर मंजुषा नागपूरे यांनी सहभाग नोंदवत भाषण केले. इतर पदाधिकाऱ्यांनीही यावेळी भाषणे केली. या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस भवनच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काँग्रेस भवनात जमलेले कार्यकर्तेही आक्रमक झाले. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही कार्यकर्ते, पोलिस व पत्रकार जखमी झाली. याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, आंदोलनामध्ये महापौर मंजुषा नागपूरे यांनी सहभाग घेऊन राजकीय भाषण केल्याने त्यांच्या या भूमिकेबद्दल राजकीय व सामाजिक स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. महापौरांनी व्यापक समाज हिताच्या आंदोलनामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. मात्र, अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनात सहभागी होऊन भाषण करणे चुकीचे व महापौर पदाची गरीमा बाधीत करण्यासारखे असून, महापौरांनी या हिंसक आंदोलनात सहभागी होणे टाळले असते, तर बरे झाले असते, असे मत व्यक्त केले जात आहे. महापौरांच्या आंदोलनातील सहभागावर मित्र पक्षाच्या नेत्यांनी उघडपणे टीका केली आहे.
 
भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचीही नाराजी
बिनविरोध नगरसेवक आणि त्यानंतर बिनविरोध महापौर होऊन इतिहास घडविलेल्या महापौर मंजुषा नागपूरे यांनी भाजपच्या राजकीय आंदोलनात सहभाग घेतल्याने विविध घटकांमधून नाराजीचा सूर निघत आहे. मात्र, त्यांच्या आंदोलनातील सहभागावर खुद्द भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि नगरसेवकांनी खासगीत बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. आमची नावे कुठेही येऊ देऊ नका, अशी विनंतीही त्यांनी माध्यमांकडे केली आहे. 


राजकीय कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी ठीक आहे. मात्र, संविधानिक पद असलेल्या व्यक्तीने राजकीय आंदोलनापासून दूर राहणे गरजेचे आहे. महापौर तर शहराच्या प्रथम नागरिक असतात. त्यामुळे महापौरांनी कुण्या एका पक्षाचे नव्हे, तर शहराचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. महापौर पदावर निवड झालेली व्यक्ती पक्षाच्या बाहेर गेलेली असते. त्यामुळे महापौरांनी राजकीय आंदोलनात सहभागी होणे चुकीचे आहे.  - विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते

विधायक कामे, सामाजिक हितासाठी आंदोलनात महापौर यांनी सहभाग घेतला तर काही गैर नाही. मात्र, महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. त्यामुळे महापौर यांनी राजकीय अथवा पक्षीय आंदोलनात सहभागी होणे अपेक्षित नाही. महापौर म्हणून त्यांनी काही नैतिक बंधने पाळली पाहिजेत. - अंकुश काकडे, माजी महापौर, पुणे महापालिका

भाजपने टिपू सुलतान विरोधात आंदोलन केले आणि आंदोलनात हिंदूंची, बहुजनांची डोकी फोडली. विशेष म्हणजे पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक महापौर मंजूषा नागपुरे या आंदोलनाचे नेतृत्व करत होत्या. महापौर होणारी व्यक्ती कुठल्याही एका राजकीय पक्षाची राहात नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने अशा प्रकारच्या राजकीय आंदोलनांना सहभागी होणे चुकीचे आहे. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पुणेकरांची डोकी फुटणे, हे दुर्दैवी असून, महापौरांचे हे वर्तन कुठेतरी चुकीचे आहे. - रवींद्र धंगेकर, माजी आमदार, उद्धवसेना
 
महापौर मंजूषा नागपुरे यांना महापौर पदाची गरिमा शिकवणे गरजेचे आहे. महापौर पदाची शिस्त काय आहे, हे शिकवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौर नागपुरे यांचा लवकरच क्लास घ्यावा. महापौरांनी राजकीय आंदोलनात सहभागी झालेला दिवस काळा दिवस म्हणून इतिहासात नोंद होईल. - रूपाली पाटील-ठोंबरे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)
 
राजकीय पक्ष कोणताही असो, त्यामध्ये धिंगाणा घालणारे, हिंसा करणारे कमी-जास्त प्रमाणात काही कार्यकर्ते असतातच. आंदोलनाच्या वेळी हिंसा झाल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिस गुन्हे दाखल करतात. अशावेळी महापौर पदासारख्या व्यक्तीने या सर्वांपासून दूर राहणे अपेक्षित आहे. हिंसक आंदोलनात गुन्हा दाखल झाला तर केवळ महापौर असलेल्या व्यक्तीचे नव्हे, तर शहराचे नाव खराब होते. त्यामुळे महापौरांनी यापुढे काळजी घेणे गरजेचे आहे. - जयराम नागरगोजे, ज्येष्ठ नागरिक. 

 

Web Title : महापौर दल के नहीं, शहर के हैं; विरोध में भाग लेना गलत।

Web Summary : पुणे के नागरिकों ने भाजपा के विरोध में महापौर की भागीदारी की आलोचना की, जो हिंसक हो गया। उनका तर्क है कि महापौर को शहर का प्रतिनिधित्व करना चाहिए, न कि किसी राजनीतिक दल का, और पक्षपातपूर्ण घटनाओं से बचकर पद की गरिमा बनाए रखनी चाहिए। महापौर की कार्रवाइयों की कई दलों ने आलोचना की है।

Web Title : Mayor represents city, not party; participation in protest wrong.

Web Summary : Pune citizens criticize the Mayor's participation in a BJP protest that turned violent. They argue the Mayor should represent the city, not a political party, and maintain the dignity of the office by avoiding partisan events. The mayor's actions have drawn criticism from multiple parties.