घरफोडीच्या गुन्ह्यातील ४ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर गुन्हे शाखेकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:21 IST2025-10-08T14:20:33+5:302025-10-08T14:21:24+5:30
- घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दिपक घारोळे हा बिराजदार नगरजवळ असलेल्या कालव्याच्या कडेला उभा असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.

घरफोडीच्या गुन्ह्यातील ४ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर गुन्हे शाखेकडून अटक
लोणी काळभोर ( पुणे जि. ) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना चकवणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ६ च्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान हडपसर येथील बिराजदार नगर येथून मंगळवारी (दि. ८) अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार, दिपक नामदेव घारोळे (वय २४, रा. गल्ली नं. ३, बिराजदार नगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी घारोळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. मागील चार वर्षांपासून तो वेशांतर करून पोलिसांना चकवा देत होता.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ६ चे पथक लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग करत असताना, घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दिपक घारोळे हा बिराजदार नगरजवळ असलेल्या कालव्याच्या कडेला उभा असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, काटे, लांडे, धाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.