Pune Crime: कोथरूडमध्ये पुन्हा दहशत; घरफोडीच्या उद्देशाने दोन आरोपींची सोसायटीत घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:05 IST2025-10-01T11:04:12+5:302025-10-01T11:05:02+5:30
Pune Crime: या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच बळावली

Pune Crime: कोथरूडमध्ये पुन्हा दहशत; घरफोडीच्या उद्देशाने दोन आरोपींची सोसायटीत घुसखोरी
पुणे - कोथरूड परिसरात गुन्हेगारी प्रकारांची मालिका सुरूच असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या घटनेत कोथरूडमधील एका नामांकित सोसायटीत दोन संशयित आरोपी घरफोडीच्या उद्देशाने घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी हातात हत्यारे घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच बळावली आहे. माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
प्राथमिक चौकशीत ही कारवाई घरफोडीच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सोसायटीत सुरक्षेची व्यवस्था अपुरी असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, कोथरूड परिसर असुरक्षित होत चालला आहे का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.