साखरेचा दर प्रतिकिलो ४१ रुपये करा; इथेनॉल दरवाढीची केंद्राकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 13:39 IST2026-01-11T13:38:31+5:302026-01-11T13:39:15+5:30
दरघटीमुळे साखर उद्योग अडचणीत; ऊस बिले अदा करण्यात अडथळे -हर्षवर्धन पाटील

साखरेचा दर प्रतिकिलो ४१ रुपये करा; इथेनॉल दरवाढीची केंद्राकडे मागणी
इंदापूर : चालू गळीत हंगामाच्या प्रारंभी साखरेच्या दरात तब्बल तीनशे रुपयांची घट झाल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून, साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करावा, तसेच इथेनॉलचा विक्री दर वाढवावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. यासंदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच देशभरात साखरेचे दर ३ हजार ८५० रुपयांवरून ३ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल इतके घसरले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इथेनॉलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसताना साखरेच्या दरातील ही घसरण साखर कारखानदारीसाठी गंभीर ठरत आहे. सध्या देशभरात ऊस गळीत हंगाम वेगात सुरू असला, तरी साखर व इथेनॉल या दोन प्रमुख उत्पन्न स्रोतांमधून मिळणाऱ्या अपुऱ्या महसुलामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना १४ दिवसांत ऊस बिले अदा करणे कठीण होत आहे.
यामुळे कारखान्यांना बँकांकडून वाढीव कर्ज घ्यावे लागत असून, व्याजाच्या ओझ्याखाली दबले जाण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांची उसाची बिले वेळेवर जमा व्हावीत, यासाठी साखरेचा किमान दर प्रतिकिलो ४१ रुपये आणि इथेनॉलचा विक्री दर वाढवणे अत्यावश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
या मागण्यांबाबत वेळ निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व उत्तर प्रदेश या प्रमुख साखर उत्पादक राज्यांतील साखर कारखानदारीचे प्रतिनिधी असलेले राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे शिष्टमंडळ केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन वस्तुस्थितीनिष्ठ व अधिकृत आकडेवारी सादर करून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तफावतीमुळे आर्थिक ताण
साखर (नियंत्रण) आदेश २०२५ च्या कलम ९ नुसार साखरेच्या किमान आधारभूत किमतीत उसाचा एफआरपी, रूपांतरण खर्च व उपउत्पादनांच्या महसुलाचा विचार करणे आवश्यक आहे. सध्या प्रतिटन उसाचा तोडणी व वाहतुकीसह सरासरी खर्च चार हजार रुपयांपेक्षा अधिक आहे, तर साखरेची सरासरी विक्री किंमत ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतकी आहे. या तफावतीमुळे आर्थिक ताण वाढून उसाची देयके देण्यात विलंब होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
याआधी साखरेची प्रतिकिलो किमान विक्री किंमत ३१ रुपये असताना उसाचा प्रतिटन एफआरपी २ हजार ७५० रुपयांवरून ३ हजार ५५० रुपयांपर्यंत वाढला असून, ही वाढ सुमारे २६ टक्के आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशात एक्स-मिल साखरेचे दर ३८ ते ४० रुपये प्रति किलो, तर किरकोळ विक्री दर ४६ ते ४७ रुपये प्रति किलो होते. हे दर ग्राहकांनी विनातक्रार स्वीकारल्याने साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. -हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ