सोमेश्वरच्या सभासदांना पहिल्या हप्त्यापोटी मिळणार टनाला ३३०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:12 IST2025-11-26T12:11:49+5:302025-11-26T12:12:20+5:30
आजअखेर एकूण २ लाख ४ हजार २५५ मे. टन गाळप झाले असून जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे.

सोमेश्वरच्या सभासदांना पहिल्या हप्त्यापोटी मिळणार टनाला ३३०० रुपये
सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या सन २०२५-२०२६ चालू गळीत हंगाममध्ये गाळपास येणाऱ्या उसासाठी पहिला हप्ता प्रतिटन ३ हजार ३०० रुपयेप्रमाणे देणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून चालू असून सध्या १० हजार मे. टन प्रतिदिन क्षमतेने गाळप होत आहे. आजअखेर एकूण २ लाख ४ हजार २५५ मे. टन गाळप झाले असून जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. तसेच डिस्टीलरीमधून ९ लाख २० हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे तर सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून १ कोटी १५ लाख ५४ हजार ९२० युनिट्सची महावितरण कंपनीस विक्री केलेली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची विकासाची घोडदौड चालू असून गाळप हंगाम २०२५-२६ हा देखील विक्रमी व यशस्विरीत्या पार पडेल अशा प्रकारचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे. या हंगामामध्ये साधारणपणे १४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून ऊसपुरवठा सातत्याने होण्याच्या दृष्टिकोनातून पुरेशी ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली आहे.
शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) प्रतिटन ३ हजार २८५ रुपये प्र.मे.टन इतका निघत असून, संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी ३ हजार ३०० रुपये प्र.मे.टन देण्याचे निश्चित केलेले आहे. दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळितास आलेल्या उसाची प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये २ दिवसांमध्ये वर्ग करीत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.