मनोरुग्ण पळून जाण्याच्या घटनांची गंभीर दखल; येरवडा मनोरुग्णालयाचे सहा कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 18:23 IST2025-08-23T18:22:58+5:302025-08-23T18:23:08+5:30

पुरुष परिचर, सुरक्षारक्षक आणि हवालदारांचा २४ तास बंदोबस्त असतानाही रुग्ण पळून जात असल्याने सुरक्षा चव्हाट्यावर आली होती.

pune news six employees of Yerwada Psychiatric Hospital suspended | मनोरुग्ण पळून जाण्याच्या घटनांची गंभीर दखल; येरवडा मनोरुग्णालयाचे सहा कर्मचारी निलंबित

मनोरुग्ण पळून जाण्याच्या घटनांची गंभीर दखल; येरवडा मनोरुग्णालयाचे सहा कर्मचारी निलंबित

पुणे : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातून काही दिवसांपूर्वी वॉर्डातून मनोरुग्ण पळून गेल्याच्या घटनेची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत उपसंचालकांनी सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून, एका कर्मचाऱ्याचा आदेश प्रलंबित आहे. एकाचवेळी सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने खळबळ माजली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात मागील काही दिवसांत विविध वॉर्डातून सातत्याने रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

रुग्णालयातील सुजय आणि २७ क्रमांक वॉर्डातून पाच रुग्ण पळून गेले. पुरुष परिचर, सुरक्षारक्षक आणि हवालदारांचा २४ तास बंदोबस्त असतानाही रुग्ण पळून जात असल्याने सुरक्षा चव्हाट्यावर आली होती. त्यामुळे प्रशासनाने सुजय वॉर्ड आणि २७ क्रमांक वॉर्डातील प्रत्येकी दोन, मुख्य प्रवेशद्वारील दोन हवालदार असे सहा कर्मचारी आणि स्वयंपाक गृहातील स्वयंपाकी दारूच्या नशेत आढळून आल्याने सातजणांना निलंबित करीत असल्याची नोटीस बजावली होती.

या प्रकरणी कामगार संघटनांनी प्रशासनाविरोधात आक्रमक आंदोलन केले होते. कर्मचाऱ्यांवरील कारवाईचे अधिकारी आरोग्य उपसंचालकांना आहे. त्यामुळे प्रशासनाने निलंबनाचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी उपसंचालकांकडे पाठविले होते. उपसंचालक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी प्रस्तावाची सखोल चौकशी केली. त्यात वॉर्डातील आणि प्रवेशद्वारातील कर्मचारी दोषी आढळून आले. त्यांनतर उपसंचालक डॉ. येमपल्ले यांनी सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाचा आदेश काढला. निलंबितांमध्ये पुरुष परिचर सागर जाधव, संतोष जंगम, रजनीकांत चौधरी, प्रभाकर मुंडकर. हवालदार आनंद सावंत, शिवाजी वीर यांचा समावेश आहे.

Web Title: pune news six employees of Yerwada Psychiatric Hospital suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.