'पॅट' परीक्षेत प्रश्नपत्रिकांचा तुटवडा; शाळांनाच काढावी लागली झेरॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:53 IST2025-10-14T15:53:16+5:302025-10-14T15:53:42+5:30
- एससीईआरटीकडून यु-डायस प्रणालीवरील आकडेवारीनुसार पुरवठा; अनेक शाळांना आल्या अडचणी; १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा; शिक्षक संघटनांनी नोंदवला आहे तीव्र निषेध

'पॅट' परीक्षेत प्रश्नपत्रिकांचा तुटवडा; शाळांनाच काढावी लागली झेरॉक्स
पुणे : राज्यभरात घेण्यात आलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट) मध्ये एकीकडे प्रश्नपत्रिकांचा तुटवडा तर दुसरीकडे पेपरफुटीच्या आरोपांमुळे शिक्षण विभागावर टीकेची झोड उठली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थट्टा झाल्याचा आरोप शिक्षक, मुख्याध्यापक संघटनेकडून केला जात आहे.
राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये सुरू असलेल्या पॅट (संकलित मूल्यमापन चाचणी) परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक शाळांना अडचणींचा सामना करावा लागला. काही शाळांना शेवटच्या क्षणी प्रश्नपत्रिका मिळाल्या, तर काहींना स्वतःच्या खर्चाने झेरॉक्स काढाव्या लागल्या. यामुळे शिक्षकवर्ग त्रस्त झाला असून, नियोजनातील त्रुटीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पॅट परीक्षा (संकलित मूल्यमापन चाचणी) १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात आली. मात्र, अनेक जिल्ह्यांतील शाळांमध्ये प्रश्नपत्रिकांचा तुटवडा निर्माण झाल्याने परीक्षेचे सुरळीत आयोजन करण्यात अडथळे आले.
पेपरफुटीचे आरोप आणि गुन्हा दाखल
गणिताच्या पेपरच्या आदल्या दिवशीच एका युट्यूब वृत्तवाहिनीवर पॅट परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे फोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, संबंधित युट्यूब चॅनेल्स सायबर विभागाच्या मदतीने बंद करण्यात आले असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली.
शिक्षक संघटनांनी या प्रकाराला तीव्र विरोध दर्शविला आहे. शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी म्हणाले, 'पॅट परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पाया मानली जाते. परंतु नियोजनाच्या अभावामुळे तिचं गांभीर्यच हरवत आहे. पुढील परीक्षांपूर्वी जिल्हा शिक्षण विभागाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.'
शाळेत इंग्रजी आणि उर्दू दोन्ही माध्यम आहेत. आठवीच्या पॅट परीक्षेदरम्यान इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजी विषयाच्या १८० आणि गणित विषयाच्या २६५ प्रश्नपत्रिका कमी पडल्या. उर्दू माध्यमाच्या शाळेत यु-डायन प्रणाली आहे, परंतु इंग्रजी माध्यमाची यु-डायस प्रणाली नसल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. - राज मुजावर, शिक्षक
'पॅट परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाची महत्त्वाची प्रक्रिया आहे. पण प्रश्नपत्रिकाच कमी मिळाल्या तर त्यांच्या अभ्यासाची खरी कसोटी कशी लागणार?' - महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ