महाराष्ट्र पोलिस भरती पोर्टलवरील भरती प्रक्रियेचा मजकूर एका रात्रीत हटविला; भरतीची तयारी करणारे विद्यार्थी संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:17 IST2025-10-04T14:17:14+5:302025-10-04T14:17:41+5:30
भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, अचानक पोर्टलवरील मजकूर काढल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

महाराष्ट्र पोलिस भरती पोर्टलवरील भरती प्रक्रियेचा मजकूर एका रात्रीत हटविला; भरतीची तयारी करणारे विद्यार्थी संभ्रमात
- प्रशांत ननावरे
बारामती : महाराष्ट्रपोलिस भरती पोर्टलवर महाराष्ट्रपोलिस दलामध्ये १५ हजारांपेक्षा जास्त पोलिसपदांची भरतीप्रक्रिया सुरू झाल्याचे एन विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि.२) जाहीर करण्यात आले होते. यामध्ये भरतीप्रक्रिया ७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यंदा सन २०२२ ते २०२५ पर्यंतच्या वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही एक विशेष संधी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, अचानक पोर्टलवरील मजकूर काढल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.
पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बॅन्डमॅन, कारागृह शिपाई आणि सशस्त्र पोलिस शिपाई (SRPF) या पदांचा सामावेश असल्याचे त्या संकेतस्थळावर दाखविण्यात आले होते. गेल्यावर्षी १८ हजारांपेक्षा जास्त पदांची भरतीप्रक्रिया पार पडली होती. याही वर्षी १५ हजारांपेक्षा जास्त पदांची ही मोठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे, त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त होत असताना पोर्टलवरील मजकूर हटविल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.
पोलिस शिपाईपदासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ७ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच साधारणतः ३० दिवस असणार आहे. पोलिस शिपाईपदासांठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे व त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार ११० : प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेतसुध्दा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशाप्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार असल्याची माहिती संबंधित पाेर्टलवर देण्यात आली होती.
बारामतीतील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी महाराष्ट्र पोलिस भरती पोर्टलवर महाराष्ट्र पोलिस दलामध्ये १५ हजारांपेक्षा जास्त पोलिसपदांची भरतीप्रक्रिया सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. यावर प्रक्रियेबाबत तारीखनिहाय माहिती देण्यात आली होती. मात्र, एका रात्रीत मजकूर हटविल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांची दिशाभूल करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिकृत माहिती संबंधित विभागाने जाहीर करून भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांच्यातील संभ्रम दूर करावा, असे आवाहन रूपनवर यांनी केले आहे.