- अंबादास गवंडी
पुणे : खान-पानाचा दर्जा सुधारण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक प्रयोग केले आहेत. त्यामुळे कॅटरिंगच्या उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. कॅटरिंगमधून पुणेरेल्वे विभागाला गेल्या सहा महिन्यांत तब्बल १ कोटी, ७१ लाखांचा महसूल मिळाला आहे.रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ दर्जाहीन असल्याची ओरड आणि तक्रारी गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्याची दखल घेऊन पुणे विभागातील वाणिज्य विभागाकडून नियोजनबद्ध प्रयत्न केले. दर्जाहीन खाद्यपदार्थ विकणाऱ्या वेंडर्सवर वारंवार कारवाई करण्यात आली. अवैध वेंडर्सना रेल्वे स्थानके आणि रेल्वे गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ तसेच पेय विकण्यास मनाई करण्यात आली. रेल्वे गाड्यांमधील किचनचा दर्जा तपासण्यासाठी, तसेच तेथील खाद्यपदार्थ चांगले आहेत की नाही, ते तपासण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या गाड्यांमध्ये तपासणी करून नमुने गोळा केले गेले. अस्वच्छ किचन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. यामुळे रेल्वेत खान-पान सेवा देणाऱ्यांनी दर्जा सुधारण्यावर भर दिला. चांगले पदार्थ मिळत असल्याने प्रवाशांकडूनही मागणी वाढली. त्याचाच परिणाम म्हणून कॅटरिंगच्या उत्पन्नात वाढ झाली.
सेवेत कसूर; दंडाचा दणका
एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या (पुणे विभाग) कॅटरिंगमधून १ कोटी, ७० लाख, ९८ हजारांचा महसूल मिळाला. अगदी एका महिन्याच्या उत्पन्नाचा विचार केल्यास गेल्या सप्टेंबर महिन्यात ४८ लाख, ७३ हजारांचे उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण २.५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. रेल्वे प्रवाशांना सेवा न देणाऱ्या कॅटरिंग व्यवस्थापकावर पुणे विभागाने कारवाई करून गेल्या सहा महिन्यांत ६ लाख, ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आकस्मिक भेटी आणि तपासण्या
परवानगी नसताना रेल्वे प्रवाशांना खाद्यपदार्थ, तसेच विविध पेये देणाऱ्या २०० अवैध वेंडर्सविरुद्ध धडक कारवाई करून महिनाभरात त्यांच्याकडून ५६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ठिकठिकाणी लागलेल्या खान-पानाच्या स्टॉल्सवर अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली. बेस किचनमध्ये स्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांची तपासणी करण्यासाठीही अधिकाऱ्यांनी अचानक भेटी दिल्या.
उत्पन्नाची आकडेवारी
महिना -- २०२४-२५ ---- २०२५-२६ ---- दंड
एप्रिल-- २३,८०,०३७--२३,६१,१२१--६०,०००
मे -- २१,४६,२८४--६,७०,७२१--१,५७,५००
जून -- २२,७५,७५०--३३,२८,७४५--१,५५,०००
जुलै-- १२,४३,०३२--३७,९२,३३८--९०,५००
ऑगस्ट-- ४२,६५,९५६--१७,०२,८८४--१,५८,०००
सप्टेंबर-- १७,२४,२७६--४८,७३,१८३--५३,०००
रेल्वे गाड्यांमधील किचनचा दर्जा तपासण्यासाठी, तसेच तेथील खाद्यपदार्थ चांगले आहेत की नाही, ते तपासण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या गाड्यांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांना चांगले खाद्यपदार्थ देण्यासाठी कटिबद्ध आहे. कॅटरिंगचा दर्जा सुधारल्यामुळे उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी
Web Summary : Central Railway's efforts to improve food quality boosted catering revenue. Pune division earned ₹1.71 crore in six months. Action against vendors selling substandard food and surprise inspections of kitchens ensured better quality, leading to increased passenger demand and higher revenue.
Web Summary : मध्य रेलवे के प्रयासों से खानपान की गुणवत्ता में सुधार हुआ, जिससे राजस्व बढ़ा। पुणे मंडल ने छह महीनों में ₹1.71 करोड़ कमाए। घटिया भोजन बेचने वाले विक्रेताओं पर कार्रवाई और रसोई के निरीक्षण से गुणवत्ता बढ़ी, जिससे यात्रियों की मांग और राजस्व में वृद्धि हुई।