गुणवत्ता घसरली, पाच शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:28 IST2025-11-25T13:49:51+5:302025-11-25T14:28:26+5:30
जिल्हा परिषद प्रशासनाकडे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यामिक शिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गुणवत्ता घसरली, पाच शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस
पुणे : ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेतलेल्या मॉडेल स्कूल उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील १५८ शाळांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. या शाळांमधील पाच शिक्षकांना विद्यार्थी वर्गाची गुणवत्ता घसरल्याने पुणे जिल्हा परिषदेकडून कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, जिल्हा परिषद प्रशासनाकडे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यामिक शिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या वर्षीपासून मॉडेल स्कूल हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत डॅश बोर्ड तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये बसून मु्ख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुलांच्या गुणवत्तेचा आढावा घेता येत आहे. गुणवत्ता वाढीसाठी दर महिन्याला परीक्षाही घेण्याचे काम परिषदेकडून केले जात आहे. या परीक्षेतील अहवालानुसार पाच शिक्षकांकडून चुकीचे प्रकार अथवा काही त्रुटी या आढळून आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून या शिक्षकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. हे शिक्षक गैरहजार राहत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांना तातडीने खुलासा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. या पाच शिक्षकांना सुधारणा करण्यासाठी संधी दिली जाणार आहे. त्याचबरोबर आता उपक्रमशील सेलची टीमही या शिक्षकांच्या मदतीला जाणार आहे.
इस्रो आणि नासा या उपक्रमात जिल्ह्यातील काही शाळांमधील मुले सहभागी झाली होती. अनेक शाळांमधील शिक्षणांचा दर्जा हा चांगला आहे. त्यांचे कौतुकही प्रशासनाकडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता उपक्रमशील शिक्षकांचा सेल तयार करण्यात आला आहे. त्यात ५२ शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. हे शिक्षक गुणवत्ता व इतर उपक्रमात कमी झालेल्या शाळांना मदत करणार आहेत. त्यासाठी हे शिक्षक त्या शाळेतून पोहचून वेगवेगळे वर्ग घेणार आहेत.