Pune News: पोलिसाचे अवैध धंद्यांना पाठबळ! अंमलदारासह वरिष्ठ निरीक्षकावरही कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:27 IST2025-12-19T11:26:57+5:302025-12-19T11:27:12+5:30
या भागातील अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या ते सातत्याने संपर्कात असल्याचे तसेच त्यातून आर्थिक लाभ घेत असल्याचे तपासात स्पष्ट झाले

Pune News: पोलिसाचे अवैध धंद्यांना पाठबळ! अंमलदारासह वरिष्ठ निरीक्षकावरही कारवाईचा बडगा
किरण शिंदे
पुणे: पोलीस खात्याच्या शिस्तीला तडा देणारा आणि वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली उडवणारा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या एका पोलीस अंमलदाराने थेट सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या प्रकरणात आता केवळ अंमलदारच नव्हे तर स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकही कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत.
पोलीस अंमलदार नवनाथ शिंदे यांची नेमणूक स्वारगेट पोलीस ठाण्यात असताना, ते वारंवार सहकारनगर परिसरात जात होते. या भागातील अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या ते सातत्याने संपर्कात असल्याचे तसेच त्यातून आर्थिक लाभ घेत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहकारनगर परिसरात केलेल्या कारवाईत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणानंतर नवनाथ शिंदे यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करत निलंबन करण्यात आले. मात्र ही बाब केवळ एका कर्मचाऱ्यापुरती मर्यादित न राहता आता थेट वरिष्ठ निरीक्षकांच्या भूमिकेवरही बोट ठेवण्यात आले आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम यांचे संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे तसेच त्यांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचे पर्यवेक्षण केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ही बाब गंभीर, खेदजनक आणि पोलीस शिस्तीच्या पूर्णतः विरोधात असल्याचे नमूद करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम यांना वार्षिक वेतनवाढ रोखण्यात का येऊ नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी दिलेल्या खुलाशानंतर त्यांच्यावर कठोर ताशेरे ओढण्यात आले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
‘वसुली बहाद्दर’ ६५ कर्मचारी पुन्हा चर्चेत
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘वसुली बहाद्दर’ म्हणून ओळख असलेल्या तब्बल ६५ पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली होती. स्वारगेट, बंडगार्डन, शिवाजीनगर, फरासखाना आणि मुख्यालयात या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यापुढे हे कर्मचारी कोणत्याही प्रकारच्या वसुली किंवा बेकायदेशीर कामात सहभागी होणार नाहीत, याची सक्त ताकीदही संबंधित पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली होती.
मात्र प्रत्यक्षात आजही काही पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस आयुक्तांच्या आदेशांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. स्वारगेट प्रकरणात ज्या प्रकारे वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई झाली, त्याच धर्तीवर इतर पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान पोलीस अंमलदाराच्या गैरकृत्यामुळे थेट वरिष्ठ निरीक्षकावरच कारवाई झाल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्यांच्या गैरकृत्यांना पाठीशी घालणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा संदेश पोलीस आयुक्तांनी दिला असून, पुढील काळात आणखी कोण-कोण कारवाईच्या रडारवर येणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.