केडगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे हाल;पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची कमतरता, आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:49 IST2025-09-02T15:48:57+5:302025-09-02T15:49:15+5:30
नुकतेच १२.५५ कोटी रुपये खर्चून स्टेशनचे नूतनीकरण झाले असले तरी, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मूळ गरजा दुर्लक्षित होत असल्याने संताप व्यक्त

केडगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे हाल;पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची कमतरता, आंदोलनाचा इशारा
बापू नवले
केडगाव : दौंड तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या केडगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. सकाळी ८:५० वाजता बारामती-पुणे डेमू गाडी गेल्यानंतर सायंकाळी ५:२६ वाजेपर्यंत पुण्याकडे जाणारी कोणतीही गाडी उपलब्ध नसल्याने स्टेशन अक्षरशः धूळखात पडत आहे. आसपासच्या २५ ते ३० गावांमधील सुमारे ३,००० हून अधिक प्रवासी पुण्याला जाण्यासाठी या स्टेशनवर अवलंबून आहेत. मात्र, गाड्यांच्या कमतरतेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
नुकतेच १२.५५ कोटी रुपये खर्चून स्टेशनचे नूतनीकरण झाले असले तरी, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मूळ गरजा दुर्लक्षित होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी आणि धोकादायक प्रवासामुळे नागरिक रेल्वेला पसंती देत आहेत. परंतु, कमी फेऱ्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
प्रवाशांचा संताप
स्थानिक रेल्वे प्रवासी संदीप पांढरे यांनी सांगितले, ‘कोविडपासून बंद झालेल्या गाड्यांची संख्या वाढवावी, अन्यथा आंदोलन करू.’ तसेच, पुण्यात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असलेल्या सारिका मोटे-जाधव यांनी सांगितले, ‘दुसऱ्या शिफ्टसाठी पुण्याला जाण्यासाठी एकही गाडी उपलब्ध नाही. रस्त्याने प्रवास करताना अनेक अडथळे येतात. रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी.’
रेल्वे प्रशासनाचे आश्वासन
पुणे डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर हेमंत कुमार बेहरा यांनी सांगितले, ‘प्रवाशांच्या मागणीनुसार काही गाड्यांना थांबा देणे किंवा नवीन गाडी सुरू करणे शक्य आहे का, याचा अभ्यास करू. याबाबत वरिष्ठांना पाठपुरावा करू.’
प्रवाशांची कोंडी
केडगाव रेल्वे स्टेशनवर गाड्यांच्या कमी फेऱ्यांमुळे डेमूमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास प्रवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.