सहा महिन्यांत १० लाखांहून अधिक रेल्वे प्रवाशांना ‘तत्काळ’ तिकिटाचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:43 IST2025-12-03T13:42:44+5:302025-12-03T13:43:04+5:30
- ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना तत्काळ तिकिटाचा दिलासा

सहा महिन्यांत १० लाखांहून अधिक रेल्वे प्रवाशांना ‘तत्काळ’ तिकिटाचा लाभ
पुणे : ऐनवेळी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून तत्काळ तिकिटाची साेय करण्यात आली आहे. यामध्ये एसी तिकिटासाठी सकाळी १० वाजता आणि स्लीपर तिकिटासाठी ११ वाजता तत्काळ तिकिटाचा कोटा खुला केला जातो. पुणे रेल्वे विभागातून एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यांत १० लाख ७७ हजार १०० प्रवाशांनी तत्काळ तिकीट काढून प्रवास केला. यामध्ये पुण्यातून तत्काळ तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
मध्य रेल्वे विभागातील पुणे रेल्वे विभाग महत्त्वाचा आहे. पुण्यातून दररोज २०० हून अधिक रेल्वेगाड्यांची ये-जा असते. यामध्ये पुणे स्थानकावरून ७२ रेल्वेगाड्या सुटतात. यामुळे प्रवाशांची गर्दी कायम असते. शिवाय रेल्वेचे तिकीट दोन महिने अगोदर आरक्षित करण्याची सुविधा आहे. त्यामुळे पूर्व नियोजित प्रवाशांकडून आरक्षण केले जाते; परंतु ऐनवेळी प्रवाशांसाठी रेल्वेकडून तत्काळ आरक्षण कोटा उपलब्ध करून दिला आहे. दररोज सकाळी १० आणि ११ वाजता तत्काळ तिकिटाचा कोटा खुला करण्यात येतो. यामध्ये तिकीट काढताना आधार नंबर टाकल्यावर ओटीपी येतो आणि त्यानंतर तिकीट काढता येते.
असा असतो स्लीपर, एसी तत्काळ तिकिटाचा कोटा :
- जवळच्या आणि लांबपल्ल्याच्या प्रत्येक गाडीला तत्काळ तिकिटाचा कोटा असतो.
- २४ डब्यांची गाडी असेल, तर स्लीपरचे २० ते ३० आणि एसटीचे ५ ते १० तत्काळ तिकीट उपलब्ध असतात.
- १८ ते २० डब्यांची गाडी असेल, तर स्लीपरचे १५ ते २० आणि एसटीचे ५ ते ७ तत्काळ तिकीट उपलब्ध असतात.
- दररोज सकाळी १० वाजता एसटी तत्काळ तिकिटाचा कोटा खुला होतो.
- तसेच सकाळी ११ वाजता स्लीपर तत्काळ तिकिटाचा कोटा खुला होतो.
पुण्यातून ६ लाखांहून अधिक तत्काळ तिकीट :
पुणे रेल्वे विभागात कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, हडपसर आणि शिर्डी ही मोठी रेल्वेस्थानके आहेत. या स्थानकांवरून तत्काळ तिकीट काढून प्रवास केला जातो. गेल्या सहा महिन्यांत पुण्यातून सर्वाधिक ६ लाख ३८ हजार ३४४ प्रवाशांनी तत्काळ तिकीट काढले आहे. त्यानंतर कोल्हापूर स्थानकावरून एक लाख ७७ हजार २४९, शिर्डी ९८ हजार १३० तिकीट काढण्यात आले.
अशी आहे आकडेवारी :
रेल्वेस्थानक ---- तिकीट काढणाऱ्यांची संख्या
पुणे -- ६,३८,३४४
शिर्डी -- ९८,१३०
कोल्हापूर -- १,७७,३४९
हडपसर --७७,०१८
दाैंड --३३,७७९
सांगली --३४,५१५
सातारा--१३०४९
मिरज-- ४,८१६
प्रवाशांच्या सोयीसाठी जवळच्या आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडीत तत्काळ तिकिटाचा कोटा उपलब्ध आहे. हा कोटा दररोज सकाळी उपलब्ध होतो. पुणे विभागातून गेल्या सहा महिन्यांत १० लाखांहून अधिक प्रवाशांनी तत्काळ तिकीट काढून प्रवास केला. यामध्ये पुण्यातील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग