कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याला रडवले; किलोला सरासरी १० रुपयाचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:48 IST2025-03-25T10:48:36+5:302025-03-25T10:48:50+5:30

नीरा बाजारात कांद्याला किलोला सरासरी १० रुपयाचा भाव

pune news Neera Agricultural Produce Market Committee the onion literally made the farmer cry | कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याला रडवले; किलोला सरासरी १० रुपयाचा भाव

कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याला रडवले; किलोला सरासरी १० रुपयाचा भाव

नीरा : मागील महिन्यामध्ये नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ३० ते ३२ रुपये किलोप्रमाणे विक्री होणारा कांदा आता ४ ते १५ रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. सरासरी पाहिले तर कांदा १० रुपये किलोने विकला जात आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्याला चांगला दर मिळत होता. आता मात्र त्याच कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी यायला भाग पाडले आहे.

महिनाभर गुंगारा देणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर जाळ्यात कसा अडकला?

पुरंदर तालुक्यातील नीरा बाजारात शनिवारी झालेल्या लिलावामध्ये एक नंबर कांद्याला १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर गोल्टी कांद्याला ४०० रुपये दर मिळाला आहे. कांद्याचा उत्पादन खर्च किलोला १७ रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे एक नंबरचा कांदा पंधरा रुपये किलोने विकला तरी शेतकऱ्याला दोन रुपये तोटा सहन करावा लागत आहे. सरासरी दर १० रुपये किलो बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला किलोला ७ ते ८ आठ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

एक नंबरच्या कांद्याला जरी १ हजार ५५० रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला असला तरी सरासरी दर हा साधारणपणे क्विंटलला ९०० ते १ हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा आठशे रुपये कमी मिळत आहेत. या मिळालेल्या रकमेतून शेतकऱ्याचा वाहतूक खर्च भागणेदेखील मुश्कील आहे.

दरम्यान, शनिवारी नीरा कांदा लिलावात ७२५ कांदा पिशव्या विक्रीसाठी आल्या होत्या. गोल्टी कांद्याला ४०० ते १,०००, ३ नंबरच्या कांद्याला ८०० ते १ हजार रुपये भाव मिळाला, दोन नंबर कांद्याला १ हजार ते १ हजार २७५ रुपये दर मिळाला. तर एक नंबर कांद्याला १ हजार ३०० ते १ हजार ५५० रुपये दर मिळाल्याची माहिती संचालक विक्रम दगडे पाटील यांनी दिली आहे.

वाढलेले उत्पादन आणि निर्यातीवरील शुल्काचा दरावर परिणाम

यावर्षी हळव्या (पावसाळी) कांद्याचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र कांद्याचे वाढणारे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यात केल्या जाणाऱ्या कांद्याला २० टक्के निर्यात शुल्क लावले. त्यामुळे निर्यातीवर परिणाम होऊन निर्यात मंदावली आणि देशातील बाजारामध्ये कांद्याची आवक जास्त झाली. याचा परिणाम म्हणून कांद्याचे भाव कमी झाले आहेत. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यापूर्वीच सरकारने २० टक्के निर्यात शुल्क शून्य टक्के करण्याची मागणी केली होती.

बैलगाडीतून कांदा वाहतूक

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर शनिवारी कांद्याचा लिलाव सुरू आहे. नीरेच्या पंचक्रोशीतील शेतकरी ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर ट्रॉली किंवा छोट्या वाहनातून कांदा बाजारत विक्रीसाठी आणतात. या वाहतुकीचा खर्चही आता परवडत नाही. हा वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी कालच्या शनिवारी पिंपरे (खुर्द) येथील शेतकऱ्याने चक्क आपल्या जुन्या बैलगाडीतून कांदा पिशव्या विक्रीसाठी आणल्या.

सांगा आम्हाला हे परवडणार कसे ?

‘१,३०० रुपये क्विंटलने कांदा विक्री परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलेय. खताची पिशवी ३,००० रुपयाला बसते. मजुरीला महिलांना २५० ते ३०० रुपये द्यावे लागतात मग सांगा आम्ही करायचे काय? आम्ही आत्महत्या करायची का? सरकार आम्हाला अनुदान देतो म्हणते, हमीभाव देतो म्हणते, पण आमच्या वाट्याला काहीच येत नाही.’ अशी खंत कांदा उत्पादक लक्ष्मण वाघापुरे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: pune news Neera Agricultural Produce Market Committee the onion literally made the farmer cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.