रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलांनी केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:41 IST2025-10-04T19:41:15+5:302025-10-04T19:41:42+5:30
लोहियानगर झोपडपट्टीत घरे लहान असल्याने अनेक मुले ही बाहेरील रिक्षा, टेम्पो अशा वेगवेगळ्या ठिकाणी रात्री थांबतात

रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलांनी केली तोडफोड
पुणे : रिक्षामधील मुलांना बाहेर काढून हटकल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांनी लोहियानगर येथील काशेवाडीतील पिंपळमळा येथील रस्त्यावर पार्क केलेल्या रिक्षा, टेम्पो, कार अशा किमान १२ वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या. ही घटना शुक्रवारी (दि.३) घडली. खडक पोलिसांनी याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
लोहियानगर झोपडपट्टीत घरे लहान असल्याने अनेक मुले ही बाहेरील रिक्षा, टेम्पो अशा वेगवेगळ्या ठिकाणी रात्री थांबतात. मोबाइलवर गेम खेळत असतात. एका रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षामध्ये बसलेल्या मुलांना बाहेर काढले व रिक्षात बसण्यास मनाई केली.
त्याच्या रागातून पहाटे तीनच्या सुमारास चौघांनी तेथे पार्क केलेल्या रिक्षा, कार, टेम्पोवर दगड, लोखंडी सळईने मारून त्यांच्या काचा फोडल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्यांना हटकल्याने त्यांनी तोडफोड केली आहे. या चार मुलांना ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई केली जात आहे.