खराडी-स्वारगेट-खडकवासला अन् नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग अशी धावणार मेट्रो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:05 IST2025-11-27T09:04:43+5:302025-11-27T09:05:32+5:30
- नव्या दोन मेट्रो मार्गिकांना मंजुरी; पूर्व-पश्चिम, दक्षिण-पश्चिम भागांना जोडल्याने वाहतुकीचा ताण होणार कमी

खराडी-स्वारगेट-खडकवासला अन् नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग अशी धावणार मेट्रो
पुणे :पुणेमेट्रोच्या टप्पा-२ मधील खराडी ते खडकवासला (मार्गिका ४) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग (मार्गिका ४ अ) या ३१.६४ किलोमीटर अंतराच्या दोन मेट्रो मार्गिकांना बुधवारी मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहराची वाहतुकीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार असून, शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम भागांना जोडणाऱ्या या मार्गिकांमुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सर्वसमावेशक होणार आहे. खराडी ते खडकवासला (मेट्रो मार्गिका ४) मार्गाची लांबी २५.५२ किमी असून, यात २२ उन्नत स्थानके असतील. हा मार्ग खराडी, हडपसर, स्वारगेट मार्गे खडकवासल्यापर्यंत जाणार आहे. याशिवाय नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग (मार्गिका ४अ) मार्ग ६.१२ किमी लांबीचा असून, यात ६ उन्नत स्थानके असणार आहेत. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी ३१.६४ किमी असून या दोन्ही मार्गांवर २८ स्थानके आहेत.
या संपूर्ण प्रकल्पासाठी ९८५७.८५ कोटींचा खर्च अपेक्षित असून, हा प्रकल्प येत्या पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे शहरातील पूर्वेकडील, मध्यवर्ती आणि पश्चिमेकडील सर्व भाग थेट जोडले जाणार आहेत. ज्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलदगतीने होणार आहे. या नवीन मार्गिका पुणे शहराच्या पूर्व, मध्य आणि पश्चिम व दक्षिण-पश्चिम या तीन मुख्य दिशांना जोडल्या जाणार आहेत. ज्यामुळे शहरातील नागरिकांना कोणत्याही दिशेला प्रवास करणे सोपे होणार आहे. यामुळे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारणार असून, वाहतूक कोंडीत गुदमरलेल्या पुणेकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. सध्या मेट्रो दैनंदिन तब्बल २ लाख ३० हजार प्रवासी वापर करीत आहेत. नव्या मार्गिकेमुळे शहरातील नागरिकांना पूर्व-पश्चिम भाग, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आयटी हबदरम्यान प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.