Pune Crime : मेफेड्रोन तस्करी करणारी टोळी गजाआड;अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:28 IST2025-10-07T17:27:54+5:302025-10-07T17:28:24+5:30
या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोनसह पाच मोबाइल संच, दोन दुचाकी असा नऊ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Pune Crime : मेफेड्रोन तस्करी करणारी टोळी गजाआड;अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पुणे : मेफेड्रोन तस्करी करणाऱ्या चार जणांच्या सराईत टोळीला पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेसात लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी), पाच मोबाइल संच, दुचाकी असा नऊ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मतीन हुसेन मेमन (वय २५, रा. हादीया हाईटस, कोंढवा ) फैजल नौशाद मोमीन (वय २६, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द ) फैयाज युसुफ शेख (वय ३६, रा. मारुती आळी, गणपती चौक, कोंढवा), सूरज राजेद्र सरतापे (वय २८, रा. चिमटा वस्ती, फातिमानगर, पुणे-सोलापूर रस्ता) अशी पोलिसांनी गजाआड केलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मेफेड्रोन, गांजा विक्री करणारे सराईत, तसेच त्यांना अमली पदार्थ पुरविणाऱ्या तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार सोमवारी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना महंमदवाडी येथील स.नं. ४२ मधील महाराष्ट्र वनविभागाच्या आनंदवनमध्ये मोकळ्या जागेत पाच व्यक्ती संशयितरीत्या कोणाची तरी वाट पाहत थांबल्याचे दिसले. पोलिसांनी सापळा रचून मेमन, मोमीन, शेख, सरतापे यांना पकडले. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे साडेसात लाख रुपयांचे ३७.६० ग्रॅम मेफेड्रोन मिळाले. या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोनसह पाच मोबाइल संच, दोन दुचाकी असा नऊ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त विजय कुंभार, अमली पदार्थ विराेधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस कर्मचारी संदीप शिर्के, विनायक साळवे, मारुती पारधी, दयानंद तेलंगे, सचिन माळवे, सर्जेराव सरगर, नागनाथ राख, नितीन जाधव, सुहास डोंगरे, संजय राजे, दत्ताराम जाधव, अक्षय शिर्के यांनी ही कामगिरी केली.