‘एमसीए’ची निवडणूक अन् सदस्य भरती नियमबाह्य;रोहित पवार निवडणूक लढवण्यास अपात्र ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:12 IST2026-01-02T13:12:12+5:302026-01-02T13:12:27+5:30
- माजी सदस्यांची निवडणूक अधिकाऱ्यांना चार पत्रे

‘एमसीए’ची निवडणूक अन् सदस्य भरती नियमबाह्य;रोहित पवार निवडणूक लढवण्यास अपात्र ?
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सदस्यांमध्ये घडवून आणलेली घुसखोरी आणि एमसीएची आगामी ६ जानेवारीला होणारी निवडणूकही नियमबाह्य असल्याबाबतची चार पत्रे माजी सदस्यांनी अंतिम मतदार जाहीर होण्याआधीच निवडणूक अधिकारी अशोक लवासा आणि के. एफ. विल्फ्रेड यांना दिली आहेत.
एमसीएमध्ये सत्ता राखण्यासाठी अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वात १५४ सदस्यांची संख्या ५७१वर नेली होती.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत महत्त्वाच्या पदांवर कार्य केलेल्या सहा माजी ॲपेक्स सदस्यांनी ही सदस्य भरती बेकायदा आणि नियमबाह्य असल्याचे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना देत आपली नाराजी व्यक्त केली होती. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आणि लातूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कमलेश ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याविरोधात दाद मागितली आहे. त्यामुळे आता न्यायालयातच या निवडणुकीबाबत निर्णय होणार आहे.
एमसीएच्या माजी सदस्यांनी याबाबत २६ डिसेंबरला ३ आणि २८ डिसेंबरला १ पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना दिले होते. त्या पत्रांमध्ये एमसीएच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या पत्रांमध्ये रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमसीएने अनेक नियमांचे उल्लंघन केले असून, त्यांना निवडणुकीत उभे राहण्याचाही अधिकार नसल्याचे म्हटले आहे. एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एमसीएमध्ये कधीही अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करण्यात आले नव्हते. सध्याच्या एमसीए संघटनेला खेळाडूंचे काहीही देणेघेणे नसून, त्यांना राजकीय हेतू साध्य करण्यात अधिक रस आहे. आजीव सदस्यांमध्ये घडवून आणलेली घुसखोरी त्याचाच एक भाग आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते आणि पक्षाच्या महत्त्वाच्या लोकांना सदस्यत्व बहाल करण्याची घाई करण्यात आली. राजकीय लोकांना सदस्यत्व देऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना क्रिकेट सामन्यांचा फुकटात आनंद लुटता येईल, याची व्यवस्था खुद्द एमसीएनेच केली आहे. त्यामुळे ही संघटना भविष्यात क्रिकेट आणि क्रिकेटपटूंसाठी काही करेल, अशी सुतराम शक्यता नाही.
प्रत्येक विभागात प्रत्येकाला मतदानाचा अधिकार
एमसीएच्या निवडणुकीसाठी वेगवेगळे गट आहेत. त्यात आजीव सदस्य, संस्थापक जिमखाना, इन्स्टिट्यूशन मेंबर, संलग्न क्लब, जिल्हा क्रिकेट संघटना या गटांमध्ये त्या-त्या गटाचे मतदार आतापर्यंत मतदान करत होते. पण, आता सर्व ५७१ सदस्यांना सर्व गटांमध्ये मतदान करता येणार आहे.
रोहित पवार निवडणूक लढवण्यास अपात्र ?
एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार जुलै २०२५मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदावर निवडून आले होते. त्यामुळे, ते एमसीएच्या निवडणुका लढण्यास अपात्र ठरतात, असा आक्षेप केदार जाधव याने नोंदवला होता. लोढा समितीच्या शिफारशीनुसार क्रिकेटव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघटनेत पदावर असलेली व्यक्ती एमसीएची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते.