अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली

By राजू इनामदार | Updated: April 3, 2025 18:12 IST2025-04-03T18:08:52+5:302025-04-03T18:12:13+5:30

शिंदेसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी केले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला लक्ष्य

pune news Mahayuti joins hands over arrest in pune rape case | अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली

पुणे : समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यात अटक आरोपी शंतनू कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला, तर तो पक्षाच्या महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचा पदाधिकारी होता, त्याने डिसेंबर २०२४ मध्येच पदाचा राजीनामा दिला हाेता, असा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केला आहे.

कुकडे याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी म्हणून धंगेकर यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगितले. राजकीय नेते व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत त्याचा वावर असतो. धर्मांतराचे रँकेट तो चालवत असून, त्याला परदेशातून पैसा मिळत आहे, असा आरोपही धंगेकर यांनी केला.



महिला आयोगाला त्याच्याबाबत पत्र देखील दिले आहे. त्याची चौकशी होईल. पोलिसांना सांगूनही पोलिस त्याच्यावर कसलीही कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न धंगेकर यांनी केला. सध्याचे तपास अधिकारी यांच्याकडून हा तपास काढून घ्यावा, सक्षम पोलिस अधिकारी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. अजित पवार यांना भेटून त्याला पक्षातून काढून टाकण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आमचा संबंध नाही

याबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मानकर यांनी सांगितले की, पक्षाच्या राज्य अल्पसंख्याक आघाडीचा तो पदाधिकारी होता. त्याने डिसेंबरमध्येच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याचा व शहर शाखेचा काहीही संबंध नाही, उलट या गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणात काहीही कारण नसताना पक्षाचे नाव घेणारे धंगेकर यांचेच त्याच्याबरोबर संबंध होते, त्यात काही फिसकटल्यानेच त्यांनी आता त्याच्यावर आरोपसत्र चालवले आहे, असेही मानकर म्हणाले. लोकसभा, त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे धंगेकर यांना काय करावे ते सूचत नाही. त्यातूनच त्यांनी पक्ष बदलला, तरीही काही होत नसल्याने आता ते विनाकारण आमच्या पक्षाचे नाव बदनाम करत आहेत, ते त्यांनी बंद करावे, असा सल्लाही मानकर यांनी दिला.

Web Title: pune news Mahayuti joins hands over arrest in pune rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.