लोकमतच्या बातमीचा दणका; बार्टीकडून पाच अधिकाऱ्यांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:26 IST2025-10-08T11:24:33+5:302025-10-08T11:26:04+5:30
बार्टी संस्थेच्या येरवडा येथील गोडाऊन बाहेर गेल्या अनेक महिन्यांपासून लाखो रुपयांची विविध पुस्तके ताडपत्रीत बांधून ठेवली असल्याने सतत पडणाऱ्या पावसाने ती खराब झाली आहेत.

लोकमतच्या बातमीचा दणका; बार्टीकडून पाच अधिकाऱ्यांचे निलंबन
लष्कर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांची महामानवाच्या विचारांची पुस्तके पावसात भिजून खराब झाल्याची बातमी ‘लोकमत’ मध्ये ७ ऑक्टोबरच्या अंकात फोटोसहित प्रकाशित झाली होती. त्याची दखल घेत आत बार्टीने पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले. प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी, प्रकल्प अधिकारी सुनंदा गायकवाड, प्रकल्प अधिकारी राहुल कवडे, प्रकल्प अधिकारी राहुल अहिवळे, डाटा एन्ट्री ऑपरेटर सोनाली विटकर असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
बार्टी संस्थेच्या येरवडा येथील गोडाऊन बाहेर गेल्या अनेक महिन्यांपासून लाखो रुपयांची विविध पुस्तके ताडपत्रीत बांधून ठेवली असल्याने सतत पडणाऱ्या पावसाने ती खराब झाली आहेत. मात्र या स्थितीबाबत आंबेडकरी कार्यकर्ते आणि वाचकांनी अगदी सुरुवातीच्या काळातच बार्टी प्रशासनाच्या वेळोवेळी पत्रव्यवहार करून निदर्शनास आणले होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते आणि त्यानंतर ही ग्रंथसंपदा पूर्णपणे खराब झाली होती. याबाबत ‘लोकमत’ मध्ये सविस्तर बातमी प्रकाशित झाली. त्यांनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या प्रकरणाला कारणीभूत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांवर दोषी असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केले आहे. याबाबत चौकशी करून या कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वारे यांनी दिली.
लाखो रुपयांच्या खराब झालेल्या पुस्तकांमध्ये भारताचे संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखाण आणि भाषणे, धम्मापद, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सीडी आणि बार्टीचे इतर प्रचार आणि प्रसाराचे साहित्य अशी मूल्यावर शासकीय पुस्तकांचा समावेश असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही ग्रंथसंपदा वाया गेल्याची हळहळ आणि आंबेडकरी कार्यकर्ते व वाचकांकडून व्यक्त होत आहे.
पुस्तकाच्या किमतीही केल्या पूर्ववत
बार्टीच्या नियामक मंडळांच्या मान्यतेने व महालेखा निरीक्षक यांच्या सहमतीने वाढवलेल्या पुस्तकांच्या किमती (एकूण किमतीच्या ५० टक्के किमतीला) देखील पूर्ववत म्हणजे एकूण किमतीच्या केवळ १५ टक्के दराने देण्याचा निर्णयदेखील झाल्याचे भरतीने स्पष्ट केले आहे.