सतीची चाल बंद करणारे राजा राममोहन राॅय नव्हे तर सुभेदार मल्हारराव होळकर; गोपीचंद पडळकरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:16 IST2025-10-12T12:16:09+5:302025-10-12T12:16:58+5:30
गोपीनाथ पडळकर म्हणाले, चौंडीमध्ये अहिल्यादेवी यांच्या नावाने आजोबा आणि नातवाने राजकारण केले. त्यानंतर त्यांचे पंधरा दिवसांतच सरकार पडले.

सतीची चाल बंद करणारे राजा राममोहन राॅय नव्हे तर सुभेदार मल्हारराव होळकर; गोपीचंद पडळकरांचा दावा
पुणे : आम्ही शाळेत शिकलो की सतीची चाल बंद करणारे राजा राममोहन राॅय होते. पण, जेव्हा खंडेराव होळकर यांचे निधन झाले, तेव्हा अहिल्यादेवी सती गेल्या असत्या तर अहिल्यादेवी यांचे कर्तृत्व समोर आले असते का? याचे सर्व श्रेय सुभेदार मल्हारराव होळकर यांना जाते. त्यामुळे सतीची चाल बंद करणारे सुभेदार मल्हारराव होळकर होते, असा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र आणि कृष्णा प्रकाशनच्या वतीने आयोजित 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूषणसिंह राजे होळकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार प्रदीप रावत, अभिनेते प्रवीण तरडे तसेच पुस्तकाचे संपादक प्रणव पाटील, कृष्णा प्रकाशनचे चेतन कोळी, ऋषिकेश सुकनूर उपस्थित होते.
छत्रपती यांचे हिंदवी स्वराज स्थापण्याचे स्वप्न मल्हारराव होळकर यांनी पूर्ण केले, असे सांगून पडळकर म्हणाले, खंडेराव होळकर यांचे निधन झाले. तेव्हा त्यांनी अहिल्यादेवी यांना सती जाऊ दिले नाही. तू माझ्या गादीवर बसून घराण्याचा वारसा पुढे नेशील असे त्यांनी अहिल्यादेवी यांना सांगितले. आज जर त्या सती गेल्या असत्या तर हे चित्र दिसलेच नसते. त्यामुळे सतीची चाल बंद करणारे सुभेदार मल्हारराव होळकर होते हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले. आज अहिल्यादेवी यांच्यासारखी कर्तृत्ववान स्त्री पाहायला मिळणार नाही. त्यांनी मंदिरे, घाट बांधले. पण, एवढ्यापुरतचे त्यांचे कर्तृत्व मर्यादित नव्हते, तर त्या कुशल प्रशासक होत्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. पण, दुर्दैवाने होळकर घराण्याचा इतिहास पुढे आला नाही.
सध्याच्या काळात राजकारण्यांना हवा तसा इतिहास लिहिला जातो. इतिहासाची मोडतोड केली जाते. आज कुणालाही महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीबद्दल पोस्ट टाकाव्याशा वाटत नाहीत. कारण, समाज जातीत विभागला गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मेघना बोर्डीकर म्हणाल्या, राजकारणाच्या माध्यमातून समाजात भांडणे लावण्याची कामे केली जातात. त्यामुळे महापुरुषांचे कर्तृत्व झाकोळले जाते. आजच्या काळात अहिल्यादेवी यांचे पैलू जोवर अंगीकारले जाणार नाहीत तोवर विकसित देश होणार नाही.
भूषण सिंह राजे होळकर म्हणाले, जो महाराष्ट्राच्या मातीत जन्माला, जो भगव्यासाठी लढला तो खरा मराठा. मग तो कुठल्याही जाती धर्मातला असो. पण, आज या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जातो. आजच्या काळात इतिहासाची मांडणी करताना कुठल्याही गोष्टी विचारपूर्वक लिहिल्या पाहिजेत. जुन्या काळात लिहिणाऱ्यांनी खूप घोळ घालवून ठेवले आहेत. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. होळकरांनी डावे उजवे न मानता राष्ट्र प्रथम ठेवले आहे. राष्ट्राला गरज लागेल तेव्हा होळकर उभे राहिले आहेत.
प्रवीण तरडे आणि प्रदीप रावत यांनी मनोगत व्यक्त केले. चेतन कोळी यांनी प्रास्ताविक केले. इंद्रायणी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. हर्षद शेजाळ यांनी आभार मानले.
गोपीनाथ पडळकर काय म्हणाले...
- चौंडीमध्ये अहिल्यादेवी यांच्या नावाने आजोबा आणि नातवाने राजकारण केले. त्यानंतर त्यांचे पंधरा दिवसांतच सरकार पडले.
- कोणताही विषय उकरून काढायचा, पेटवत ठेवायचा आणि ब्राह्मण समाजाला शिव्या द्यायच्या? कुणी हा अधिकार दिला.. अरे ब्राह्मणांनो तुम्ही का गप्प बसता. ठोसा द्यायला शिका.