फडणवीस मुख्यमंत्री आहेत कि निवडणूक आयुक्त? रमेश चेन्नीथला म्हणाले,'आयोगाला उत्तर देऊ द्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:58 IST2025-08-12T16:56:27+5:302025-08-12T16:58:19+5:30
लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण करण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस त्याचा प्रतिकार करेल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. फ्रि फेअर निवडणूक भाजपच्या कारकिर्दीत अशक्य दिसते

फडणवीस मुख्यमंत्री आहेत कि निवडणूक आयुक्त? रमेश चेन्नीथला म्हणाले,'आयोगाला उत्तर देऊ द्या'
पुणे: राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुरावे देत आरोप केले आहेत. त्याचे उत्तर देणारे देवेंद्र फडणवीस कोण आहेत? मुख्यमंत्री कि निवडणूक आयुक्त अशी टीका कॉग्रेसचे राज्य प्रभारी चेन्नीथला यांनी केली.
पक्षाने प्रदेश कार्यकारिणीसाठी खडकवासला इथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप मंगळवारी चेन्नीथला यांच्या उपस्थितीत झाला. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले. राहुल गांधी यांचे आरोप पुराव्यानिशी जाहीरपणे केलेले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न केले आहेत. त्याची उत्तरे फडणवीस का देत आहेत असे ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील,नितीन राऊत, नसीमखान यावेळी उपस्थित होते. चेन्नीथला म्हणाले, "लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण करण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस त्याचा प्रतिकार करेल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. फ्रि फेअर निवडणूक भाजपच्या कारकिर्दीत अशक्य दिसते आहे. लोकसभेत आम्ही विजयी होतो व.फक्त ५ महिन्यात विधानसभेला पराभूत हे मतचोरीशिवाय होणार नाही. बिहारमध्ये तेच होईल. बंगळुरातही तेच होणार आहे."
भाजपच्या सरकारच्या सर्व गोष्टी आमचे काँग्रेस कार्यकर्ते जनतेपर्यंत घेऊन जातील असे चेन्नीथला यांनी सांगितले. ठाकरे बंधु यांच्या युतीबाबत काँग्रेसची भूमिका काय आहे? असे विचारले असता चेन्नीथला म्हणाले, एकत्र येणे न येणे तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यात काँग्रेस कशाकरता पडेल? राज व उद्धव यांची बोलणी सुरू आहेत. ती काय आहेत याची महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना माहिती नाही. महाविकास आघाडीबरोबर यासंदर्भात काहीही बोलणी झालेली नाही. महाविकास आघाडीत ते आले तर काय वगैरे प्रश्न जरतर चे आहेत. काँग्रेस त्यावेळी याचा निर्णय घेईल.