शहरात अवैध प्री-स्कूलचे फुटले पेव..! शहराच्या मध्यवर्ती भागात केवळ ६९ संस्थाच नोंदणीकृत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:25 IST2025-11-26T11:24:45+5:302025-11-26T11:25:11+5:30
- गल्लोगल्लीत मांडलाय शिक्षणाचा बाजार, चिमुकल्यांच्या सुरक्षिततेसह भविष्याशी खेळ

शहरात अवैध प्री-स्कूलचे फुटले पेव..! शहराच्या मध्यवर्ती भागात केवळ ६९ संस्थाच नोंदणीकृत
- उज्मा शेख
पुणे: लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाची पहिली पायरी म्हणजे प्ले ग्रुप आणि नर्सरी. परंतु खरंच त्या सुरक्षित आहेत का ? तेथे दर्जेदार शिक्षण मिळते का ? असा प्रश्न पुणेकरांना भेडसावत आहे. विशेष म्हणजे, पुणे शहरात केवळ ६९ अधिकृत प्री स्कूल असताना शहरातील गल्लोगल्ली, सोसायटींच्या पार्किंगमध्ये, अरुंद वस्त्यांमध्ये, बंगल्यांमध्ये तसेच जागा मिळेल तेथे अनधिकृतपणे प्री-प्रायमरी आणि प्ले ग्रुप शाळा थाटण्यात आल्या असून शिक्षणाचा बाजार मांडल्याचे चित्र आहे.
शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात केवळ ६९ संस्थाच नोंदणीकृत आहेत. उपनगरामध्ये औंध १७७, येरवडा १२९, बिबवेवाडी १७७, हडपसर २५२ संस्था नोंदणीकृत आहेत; मात्र पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता ६९ ही संख्या फारक कमी आहे. यामुळेच कुठेही दोन-तीन खोल्या घ्यायच्या आणि प्री-स्कूल सुरु करायचे, असा हा शिक्षणाचा बाजार शहरात सध्या जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 'लोकमत'च्या टीमने पर्वती, सहकारनगर, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, तळजाई, कोरेगाव पार्क यांसह अनेक भागांत पाहणी केली असता सर्रास नोंदणीविनाच, नियमबाह्य आणि बालसुरक्षेच्या निकषांची पूर्तता न करता गल्लोगल्ली अशा शाळा भरवल्या जात असल्याचे दिसून आले आहे.
शिकवणाऱ्यांकडे आवश्यक पात्रताच नाही
'एनईपी २०२०' मध्ये प्री-प्रायमरी शिक्षणासाठी स्पष्ट नियम आहेत. नोंदणी अनिवार्य, सुरक्षित इमारत, प्रशिक्षित शिक्षक, बाल अनुकूल अभ्यासक्रम आणि नियमित तपासणी आवश्यक आहे; पण प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी होत नाही. यासाठी प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे. शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांकडे आवश्यक पात्रताच नसते. प्रशिक्षण, बाल मानसशास्त्र व सुरक्षा नियमांची जाण नसते यामुळे मुलांच्या देखरेखीत त्रुटी राहतात. शाळा परवानाधारक, सीसीटीव्ही निगराणी, पोलिस व्हेरिफिकेशन, आरोग्य-स्वच्छतेचे निकष, अग्निसुरक्षा अशा गोष्टींची पूर्तता केली जात नसल्याच्या पालकांकडून तक्रारी येत आहेत.
बालवाडीची अधिकृत नोंदणी असणे गरजेचे आहे. कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे शहरात ज्या बालवाडी सुरू आहेत, अशा बालवाड्यांवर सरकारने त्वरित कारवाई केली पाहिजे. तसेच सर्वप्रथम पाल्यांच्या सुरक्षेसाठी संबंधित बालवाडी चालकांनी उपाययोजना केल्या पाहिजेत. राज्य सरकारने नर्सरी शाळांच्या बाबतीत नवी नियमावली शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आधी तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. - दिलीप सिंग विश्वकर्मा, महापेरेंट्स पालक संघटना
अरण्येश्वर, सातारा रोड
सातारा रोडवरील अरण्येश्वर येथील प्री-प्रायमरी संस्थेच्या अत्यंत छोट्या आवारात दोन शिक्षिका आणि १५ लहान मुले-मुली अॅक्टिव्हिटी करत होते. वरच्या मजल्यावर एलकेजी आणि यूकेजीचे वर्ग सुरू होते. गेटवर सुरक्षा रक्षक नव्हता, तसेच बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता, प्रवेश फीबाबत विचारणा केली असता संस्थाचालकांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.
तुम्हीही करा अनुभव शेअर...
तुमचे बाळ 'प्ले ग्रुप'मध्ये आहे. ती शाळा नोंदणीकृत आहे का?, सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या आहेत का?, तज्ञ शिक्षक आहेत का?, पायाभूत सुविधा मिळतात का? हे सर्व प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर वेळीच सावध व्हा अन् आम्हाला व्हॉट्सअप करून कळवा. आपले नाव गोपनीय राहील.
9156344829 या क्रमांकावर पाठवा माहिती.
सहकारनगर
सहकारनगर येथील प्री-प्रायमरी शाळेत सकाळची बॅच सुटण्याची वेळ होती. सकाळी ९ ते ११ अशी पहिली बॅच भरते. सुटण्याच्या वेळी शाळेसमोर पालकांची गर्दी होती. शिक्षिका विद्यार्थ्यांची नावे पुकारून एक-एक करून पालकांच्या हवाली करत होत्या. ही संस्था सकाळ आणि दुपार अशा दोन बॅचमध्ये चालते. जरी परिसर शांत असला तरी गेटवर सुरक्षा रक्षक नव्हता.
धनकवडी, तळजाई रोड
धनकवडी येथील दोन मजली इमारतीत चालणाऱ्या प्री-प्रायमरीत मोठ्या हॉलमध्ये प्ले ग्रुप नर्सरीचे एकत्रित वर्ग सुरू होते. प्रार्थनेसाठी मुले उभी होती आणि तीन शिक्षिका प्रार्थना म्हणत होत्या. हॉलमध्ये ठिकठिकाणी पसारा दिसत होता, बैठकीची मांडणी अस्ताव्यस्त होती. अग्निशामक यंत्रणा नव्हती. पालक बाहेर थांबलेले होते आणि येथेही सुरक्षारक्षक नव्हता.
बिबवेवाडी, इंदिरानगर
दोन मजली इमारतीच्या बाल्कनीत दोन लहान मुले पालकांची वाट पाहत होती. वर जायला अरुंद जिना. छोट्या खोलीत प्ले ग्रुपचे वर्ग होते. वरच्या मजल्यावर लोखंडी जिना होता. तिथे यूकेजी-एलकेजीचे वर्ग घेतले जातात. अग्निशमन यंत्रणा नव्हती. नोंदणीबाबत विचारले असता 'खाजगी प्री-प्रायमरी शाळेस नोंदणीची आवश्यकता नसते,' असे संस्थाचालकांनी सांगितले.